Pimpri Chinchwad: जमिनीच्या व्यवहारात वडिलांसहित दोन भावांची तीन कोटींची फसवणूक
By नारायण बडगुजर | Published: July 27, 2022 08:48 PM2022-07-27T20:48:04+5:302022-07-27T20:48:16+5:30
महिलेसह दोन व्यापारी व इतरांविरोधात गुन्हा दाखल
पिंपरी : जमिनीच्या व्यवहारात दोन भाऊ आणि त्यांचे वडील अशा तिघांची तीन कोटी नऊ लाख रुपयांची फसवणूक केली. मुळशी येथे २१ मे २०१५ ते २६ जुलै २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला. महिलेसह दोन व्यापारी व इतरांविरोधात गुन्हा दाखल केला.
संजय निवृत्ती शिंदे (वय ५२, रा. निगडी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. २६) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अशोक रामचंद्र बनकर (वय ४५, रा. हिंजवडी), गोपाळकृष्ण बाजीराव अंकुशराव (वय ३८, रा. पिंपळे सौदागर), महिला आणि त्यांचे इतर साथीदार यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ए. बी. डेव्हलपर्सचे मालक अशोक बनकर, गोपाळकृष्ण अंकुशराव यांच्या वतीने कुलमुखत्यारधारक महिला आरोपीने फिर्यादी, त्यांचे वडील निवृत्ती शिंदे आणि भाऊ समीर शिंदे यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांची मुळशी तालुक्यातील नेरे येथील एक हेक्टर ७१ आर शेत जमीन चार लाख १० हजार रुपये प्रति गुंठा या प्रमाणे सात कोटी एक लाख २५ हजारांना घेण्याचे ठरवले. दस्त नोंद केल्यानंतर एक वर्षात सगळे पैसे द्यायचे ठरले असताना फिर्यादींना आतापर्यंत तीन कोटी ९१ लाख ७५ हजार रुपये दिले. उर्वरित तीन कोटी नऊ लाख ५० हजार रुपये दिले नाहीत.
आरोपींची अगर त्यांच्या कंपनीची जमिनीच्या सात बारा उताऱ्यावर नोंद नसताना त्यांनी जयेश धर्मेंद्र सिंग राठोड यांना प्रति गुंठा चार लाख सहा हजार ५९३ रुपये प्रमाणे ९१ आर शेत जमीन विकली. गोपालकृष्ण अंकुशराव यांचे साथीदार सचिन वसंतकुमार हाके, औदुंबर प्रतापराव पाटील, राहुल प्रकाश डावळे, भरत कृष्णदेव माने यांना राहिलेली ८० आर इतकी शेत जमीन एक लाख रुपये प्रतिगुंठा प्रमाणे खरेदीखत दस्त करून विकली. यात फिर्यादी, त्यांचे वडील आणि भावाची तीन कोटी नऊ लाख ५० हजारांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.