‘शिक्षण दर्जा’साठी ३ महिने मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 02:35 AM2018-09-18T02:35:00+5:302018-09-18T02:35:21+5:30
शिक्षण समिती प्रशासनास धरले धारेवर
पिंपरी : प्रगत शाळा उपक्रम महापालिका शाळांत शंभर टक्के राबविणे, डिसेंबरमध्ये होणाऱ्या मूल्यमापन चाचणीत विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे, या विषयीच्या सूचना महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शिक्षण समिती प्रशासनास दिल्या. तसेच मूल्यमापन चाचणीच्या सज्जतेसाठी, शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली आहे.
शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर तीन महिन्यांपर्ू्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेत शिक्षण समिती निर्माण झाली आहे. तीन महिने होऊनही शिक्षण समितीत सदस्य आणि प्रशासनाचा सूर जुळलेला नाही. विषयपत्रिकेवर एकही विषय न येता, आयत्या वेळी विषय मंजूर केले जात आहे. यावरून राष्टÑवादी काँग्रेस आणि शिवसेनेने सत्ताधाºयांना धारेवर धरले होते.
महापौरबदल झाल्यानंतर राहुल जाधव यांनी आज आढावा बैठक घेतली. या वेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, सभागृह नेते एकनाथ पवार, शिक्षण समितीच्या सभापती सोनाली गव्हाणे, शिवसेनेच्या सदस्या अश्विनी चिंचवडे, राष्टÑवादीच्या सदस्या विनया तापकीर, शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्यासह विभागाचे सर्व अधिकारी
उपस्थित होते. या वेळी आयुक्तांनी शिक्षण मंडळाचा आढावा घेतला. तसेच सूचनाही केल्या. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. शैक्षणिक दर्जा वाढीसाठीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, अशा सूचना केल्या. हर्डीकर म्हणाले, ‘‘प्रगत शाळा उपक्रम महापालिकेतील सर्वच शाळांत राबविण्यात यावा. डिसेंबरमध्ये मूल्यमापन चाचणी होणार आहे. महापालिका शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना लेखन, वाचन आले पाहिजे. त्यासाठी येत्या तीन महिन्यांत प्रयत्न करण्यात यावेत, आवश्यक असणारी मदत प्रशासनाकडून केली जाईल.’’
शुक्रवारपासून महापालिका शाळांची पाहणी
साहित्य खरेदीवर लक्ष केंद्रित न करता विद्यार्थ्यांनी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत. विषयपत्रिकेवर केवळ खरेदीचे विषय आणू नयेत. चर्चेचे विषय आणावेत. शिक्षण समितीच्या सभेला शाळेतील मुख्याध्यापकांना बोलवावे. त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेण्यात याव्यात. चांगले उपक्रम केले असल्यास त्याचे सादरीकरण ठेवावे.
शाळांना भौतिक सुविधा पुरविण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचनाही देण्यात आल्या. दिल्लीतील शाळांचे कामकाज पाहण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकारी आणि सदस्यांनी दिल्ली दौरा करावा, असेही आयुक्तांनी सुचविले. तसेच शुक्रवारपासून महापालिकेच्या शाळांचा पाहणी दौरा करणार आहेत. अचानक शाळांना भेटी देऊन माहिती जाणून घेणार आहे, असे महापौर राहुल जाधव यांनी सांगितले.