पिंपरी चिंचवड शहरात कोविडचे ३० रुग्ण; बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसह वैद्यकीय यंत्रणा सज्ज
By प्रकाश गायकर | Published: January 2, 2024 06:50 PM2024-01-02T18:50:59+5:302024-01-02T18:51:57+5:30
केवळ चार रुग्णांना रुग्णालयात भरती केले असून बाकी सर्व रुग्णांवर घरीच उपचार सुरू
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. गेल्या महिन्याभरात ३० जणांना कोरोनाची लागण झाली. तर मंगळवारी (दि. २) ३५३ संशयित रुग्णांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी ३ जणांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. लागण झालेल्या सर्व रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. केवळ चार रुग्णांना रुग्णालयात भरती केले होते. तर बाकी सर्व रुग्णांवर घरीच उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सर्वाधिक ३० रुग्ण आढळले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास महापालिकेच्या रुग्णालयात बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसह सर्व तयारी आहे. मात्र, सध्याच्या कोरोना रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळत आहे. विशेष म्हणजे आढळलेला एकही रुग्णामध्ये जेएन.१ या नव्या व्हेरियंटची लागण झालेली नाही. त्यामुळे काळजीचे कारण नाही. कोरोना संशयित रुग्णांचे नमुने घेऊन चाचणीही करण्यात येत आहे. ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आदी आजार आहेत, त्यांनी स्वत:हून गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरावे. सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात सद्यःस्थितीत ३० रुग्ण सक्रिय आहेत. यापैकी अवघ्या चार रुग्णांना ॲडमिट केले होते. मात्र, या सर्व रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. मात्र, काळजी घ्यावी. - डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी.