Coronavirus| पिंपरी-चिंचवड शहरात ३० पोलीसांना कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 06:11 PM2022-01-10T18:11:06+5:302022-01-10T18:13:31+5:30
यात नऊ अधिकारी व २१ कर्मचारी आहेत...
पिंपरी : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत ३० पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सोमवारी (दि. १०) समोर आले आहे. यात नऊ अधिकारी व २१ कर्मचारी आहेत. शनिवारी बाधित पोलिसांची संख्या १४ होती.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत बाधित झालेल्या पोलिसांची संख्या एका दिवसात दुप्पट झाली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या एक पोलिसाला कोरोनाची लक्षणे दिसत असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उर्वरित पोलिसांना लक्षणे दिसून येत नसून त्यांचे घरीच विलगीकरण करण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या पहिल्या टप्प्यात १५ मे २०२० रोजी शहर पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.
फ्रंटलाईन वर्कर म्हणून पोलिसांना रस्त्यावर उतरावे लागते. कोरोना निर्बंधांची अंमलबजावणी, गुन्ह्यांचा तपास, दैनंदिन कामकाज आदी कारणांमुळे पोलिसांचा नागरिकांशी थेट संपर्क येतो. त्यामुळे पोलिसांना कोरोना विषाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे पोलिसांनी फेसशिल्ड, मास्क, सॅनिटायझर आदी सुरक्षा साधनांचा वापर करावा, अशा सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या आहेत.
कोरोना सेल होणार ‘ॲक्टिव्ह’-
तत्कालीन पोलीस आयुक्त संदीप बिष्णाई यांनी २०२० मध्ये पोलीस आयुक्तालय स्तरावर पोलिसांसाठी कोरोना सेलची स्थापना केली होती. या सेलच्या माध्यमातून कोरोनाबाधित पोलिसांसाठी उपचाराच्या सुविधा आदी उपलब्ध करून देण्यात येत होत्या. तसेच त्यांचे मनोबल उंचावण्यात येत होते. तत्कालीन पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांनी या सेलच्या माध्यमातून पोलिसांना धीर देत शहर पोलीस दल कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. सध्या पोलिसांनाही मोठ्या संख्येने कोरोना विषाणूंचा संसर्ग होत असल्याने हा कोरोना सेल पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार आहे.