पिंपरीतील डी. वाय. पाटील शाळेत ३० विद्यार्थ्यांना सँडविचमधून विषबाधा; शिक्षण विभागाची गंभीर दखल

By प्रकाश गायकर | Published: October 10, 2024 06:34 PM2024-10-10T18:34:19+5:302024-10-10T18:36:03+5:30

सँडविच खाल्ल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी मुलांना अचानक उलट्या आणि चक्कर असा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले

30 students poisoned by sandwiches at DY Patil School in Pimpri; Serious attention of Education Department | पिंपरीतील डी. वाय. पाटील शाळेत ३० विद्यार्थ्यांना सँडविचमधून विषबाधा; शिक्षण विभागाची गंभीर दखल

पिंपरीतील डी. वाय. पाटील शाळेत ३० विद्यार्थ्यांना सँडविचमधून विषबाधा; शिक्षण विभागाची गंभीर दखल

पिंपरी : शहरातील शाहूनगर येथील शिक्षण महर्षी डॉ. डी वाय पाटील इंग्लिश मिडीयम शाळेमध्ये ३० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली. शाळेमध्ये कुकिंग क्लासमध्ये बनवलेले सँडविच खाल्यानंतर मुलांना अचानक त्रास होऊ लागला. शाळेतील ३१५ मुलांनी सँडविच खाल्यानंतर त्यातील ३० जणांना उलट्या आणि चक्कर आल्याने रुग्णालयात दाखल केले. ही घटना गुरूवारी (दि. १०) सकाळी साडे दहा ते साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शाहूनगर येथील डॉ. डी वाय पाटील इंग्लिश मिडीयम शाळेमध्ये प्रत्येक वर्गनिहाय पदार्थ बनवण्याचा क्लास घेतला जातो. गुरूवारी सकाळी पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कुकिंग सेशन घेण्यात आले. त्याबाबतची कल्पना त्यांच्या पालकांना देण्यात आली होती. त्यामुळे सकाळीच मुले शाळेमध्ये टिफिन न आणता आली. सकाळी वर्गामध्ये सँडविच बनवण्यासाठी विद्यार्थी व शिक्षक जमले. त्यासाठी बाजारातून भाजीपाला, ब्रेड, सॉस आणले होते. त्याचे शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांनी सँडविच बनवले. कुकिंग सेशन पूर्ण झाल्यानंतर हे सँडविच विद्यार्थ्यांना खाण्यासाठी दिले. शाळेतील एकूण ३१५ विद्यार्थ्यांनी हे सँडविच खाले. त्यानंतर मुलांना त्यांच्या वर्गामध्ये पाठवण्यात आले. मात्र, दहा ते पंधरा मिनिटानंतर मुलांना अचानक उलट्या आणि चक्कर असा त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्रास होत असलेल्या सर्व मुलांना खाली मैदानावर आणले. त्याठिकाणाहून तातडीने शाळेची बस तसेच रिक्षाने मुलांना खासगी रुग्णालयात सकाळी साडे अकरा वाजता दाखल केले. दाखल केलेल्या मुलांपैकी ९ मुलांची प्रकृती जास्त बिघडली होती. त्यांना रुग्णालयाच्या आंतररुग्ण विभागात दाखल करून घेत उपचार केले. सायंकाळी सहा वाजता सर्व मुलांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. राज्याच्या शिक्षण विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. शिक्षण संचालनालय, अन्न व औषध प्रशासन तसेच पोलिसांकडून या घटनेचा अहवाल मागवण्यात आला आहे.

Web Title: 30 students poisoned by sandwiches at DY Patil School in Pimpri; Serious attention of Education Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.