बिले रोखल्याने वाचवले तीनशे कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 04:02 AM2017-08-13T04:02:25+5:302017-08-13T04:02:28+5:30
सत्तांतर झाल्यानंतर गेल्या काही महिन्यांत वर्षानुवर्षे सुरू असणा-या काही अनिष्ट प्रथा बंद केल्या आहेत. महापालिकेतील भ्रष्टाचार कमी होत असून, न केलेल्या कामांची बिले रोखली आहेत.
पिंपरी : सत्तांतर झाल्यानंतर गेल्या काही महिन्यांत वर्षानुवर्षे सुरू असणा-या काही अनिष्ट प्रथा बंद केल्या आहेत. महापालिकेतील भ्रष्टाचार कमी होत असून, न केलेल्या कामांची बिले रोखली आहेत. यामुळे महापालिकेचे ३०० कोटी रुपये वाचले आहेत, असे गौरवोद्गार काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारभा-यांची पाठ थोपटली.
भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात महापालिकेच्या विकास प्रकल्पांचे उदघाटन व भूमिपूजन मुख्यमंत्री यांनी केले. या वेळी ते बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट, महापौर नितीन काळजे, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, खासदार अमर साबळे, भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, बाळा भेगडे, गौतम चाबुकस्वार, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, आयुक्त श्रावण हर्डीकर, राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन आदी उपस्थित होते.
पालकमंत्री गिरीश बापट यांनी मनोगतामध्ये शहराच्या विकासासाठी निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. महापौर नितीन काळजे यांनी प्रास्ताविक केले. सीमा सावळे यांनी आभार केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.
स्मार्ट, पारदर्शक कारभार करा
ई- इनॉग्रेशन’ या पद्धतीने विकासकामांची भूमिपूजने, उद्घाटने केल्यास अधिक लोकांशी बोलता येते. खर्चही वाचतो. शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाला आहे. पुण्यापेक्षा जास्त गतीने विकास करण्याचे पिंपरी-चिंचवडमध्ये क्षमता आहे. स्मार्ट, पारदर्शक कारभार करा. महापालिकेने स्वच्छता, कचरा विल्हेवाट आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यावर भर द्यायला हवा, असा सल्ला फडणवीस यांनी दिला.
महापौरांचे लग्न अन् हशा
अविवाहित महापौर नितीन काळजे यांना उद्देशून मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाला. मेट्रोही लवकर येत आहे. मात्र, अजूनही महापौर अविवाहीत कसे ? मी अविवाहित असतानाच नागपूरचा महापौर झालो. तेव्हा मलाही याचा त्रास झाला. त्यामुळे महापौरांच्या लग्नाविषयी उत्सुकता आहे. आम्हाला लग्नाला बोलवा अथवा न बोलवा; परंतु आता लग्नाचा विषय अजेंड्यावर घ्या.’’ यावर नाट्यगृहात एकच हशा पिकला.
पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयास तत्त्वत: मान्यता दिली आहे. वाढती लोकसंख्या पाहता, आयुक्तालय कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू असून अर्थ विभागाकडे हा प्रस्ताव गेला आहे; त्यामुळे लवकरच आयुक्तालय सुरू होईल.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री