जिम ट्रेनरला सायबर चोरट्यांकडून ३५ लाखांचा गंडा; यु ट्यूब चॅनल सबस्क्राइब करण्यास सांगून फसवणूक
By नारायण बडगुजर | Published: February 26, 2024 05:37 PM2024-02-26T17:37:52+5:302024-02-26T17:38:22+5:30
चोरट्याने यु ट्यूब ॲपवर सबस्क्राईब करून टास्क पूर्ण करा, यातून तुम्हाला नफा मिळेल, असे सांगितले
पिंपरी : घरबसल्या काम देण्याच्या बहाण्याने टास्क देऊन फसवणूक केल्याचे प्रकार वाढत आहेत. यात माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील अनेक अभियंत्यांना गंडा घातल्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यात आता बाॅडी बिल्डर असलेला एक जीम ट्रेनरही सायबर चोरट्यांच्या या मायाजालात अडकला. यू ट्यूबवरील चॅनल सबस्क्राईब करायला सांगून वेगवेगळे टास्क देऊन ४२ वर्षीय जीम ट्रेनरची ३५ लाखांची फसवणूक केली. वाकड येथे १२ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत ही घटना घडली.
योगेश माधवराव सोनार (४२, रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. २६) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून शांभवी सोनी आणि टेलीग्राम खाते धारक यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी योगेश हे ‘बाॅडी बिल्डर’ आहेत. ‘फिटनेस’बाबत ते प्रशिक्षण देतात. तसेच जीम ट्रेनस म्हणून काम करतात.
दरम्यान, शांभवी सोनी आणि इतर संशयितांनी फोन करून योगेश यांच्याशी संपर्क साधला. यावेळी कोणतीही आर्थिक गुंतवणूक न करता केवळ व्हॉटसअपद्वारे यु ट्यूब ॲपवर सबस्क्राईब करून टास्क पूर्ण करा. यातून तुम्हाला नफा मिळेल, असे सांगितले. त्यानंतर टेलीग्राम चॅनेल लिंक पाठवून त्यावर टास्कसाठी त्यांची नोंदणी केली. त्यांना वेगवेगळे टास्क देऊन ते खरे असल्याचे भासवले. त्यातून योगेश यांना सुरुवातीला फायदा होत असल्याचे भासवले. त्यांच्याकडून टास्कसाठी वेळोवेळी वेगवगेळ्या बँक खात्यावर पैसे भरायला सांगितले. त्यानुसार योगेश यांनी एकूण ३५ लाख २५ हजार ३६४ रुपये खात्यांमध्ये भरले. मात्र, त्यांना कोणताही नफा किंवा त्यांनी भरलेली रक्कम परत न करता त्यांची फसवणूक केली. पोलिस निरीक्षक विठ्ठल साळुंखे तपास करीत आहेत.