मावळ मतदारसंघात ३७९० दिव्यांग मतदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 02:20 PM2019-04-02T14:20:34+5:302019-04-02T14:23:24+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगातर्फे दिव्यांग मतदारांची नोंद करण्यात आली आहे.
पिंपरी : लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगातर्फे दिव्यांग मतदारांची नोंद करण्यात आली आहे. विधानसभा मतदारसंघ आणि मतदान केंद्रनिहाय अशा मतदारांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार मावळ लोकसभा मतदारसंघात ३७९० दिव्यांग मतदार आहेत. यात उरण विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त ८६१ तर चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी ३७९ दिव्यांग मतदार आहेत.
दिव्यांग मतदारांनाही त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा, म्हणून निवडणूक आयोगाने कसोशीने प्रयत्न केले आहेत. त्यासाठी दिव्यांग मतदारांची मतदान केंद्रनिहाय यादी तयार करण्यात आली आहे. या मतदान केंद्रांचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार तेथे सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. दिव्यांग मतदार असलेल्या मतदान केंद्र तळमजल्यावर हलविण्यात आले आहेत. जे केंद्र तळमजल्यावर नाहीत अशा ठिकाणी दिव्यांगांसाठी डोलीसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
विधानसभा मतदारसंघनिहाय दिव्यांग मतदारांची संख्या
पनवेल - ७१९
कर्जत - ७५८
उरण - ८६१
मावळ - ५७९
चिंचवड - ३७९
पिंपरी - ४९४
एकूण - ३७९०
१४१ मतदान केंद्र संवेदनशील
मावळ लोकसभा मतदारसंघातील संवेदनशील केंद्रांची अंतिम यादी तयार करण्यात आली आहे. एकूण १४१ संवेदनशील केंद्र आहेत. यात विधानसभा मतदारसंघनिहाय पनवेलमध्ये ३, कर्जतमध्ये २, उरणमध्ये ११, मावळमध्ये २०, चिंचवडमध्ये ४१ आणि पिंपरीमध्ये ६४ मतदान केंद्र संवेदनशील आहेत.