पिंपरीत गणेशोत्सवासाठी ३८२० पोलिसांचा बंदोबस्त तैनात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 01:41 PM2019-09-03T13:41:36+5:302019-09-03T14:03:40+5:30
गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत...
पिंपरी : राज्य राखीव दलाच्या एका तुकडीसह एक हजार होमगार्ड, १९० पोलीस कर्मचारी आणि ३० अधिकारी अशी जादा कुमक मागविण्यात आली आहे. तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अडीच हजार कर्मचारी असे ३८२० अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून गणेशोत्सवादरम्यान बंदोबस्त राहणार आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत निगडी, पिंपरी, चिंचवड, भोसरी, एमआयडीसी भोसरी, सांगवी, हिंजवडी, वाकड, दिघी, देहूरोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, चाकण, आळंदी, चिखली असे एकूण १५ पोलीस ठाणे आहेत. या पोलीस ठाण्यांतर्गत गणेशोत्सवादरम्यान बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. आयुक्तालयांतर्गत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. शहरातील मुख्य चौक, मुख्य रस्ते, गर्दीच्या ठिकाणी तसेच महत्वाच्या गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी बंदोबस्त करण्यात येत आहे. पोलीस मित्र, नागरिक पोलीस आदी विविध संस्था, संघटना व मंडळांचे बंदोबस्तासाठी सहकार्य घेण्यात येणार आहे. वाहतूक विभागातर्फे एक सहायक पोलीस आयुक्त, नऊ पोलीस निरीक्षक, ११ सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक तसेच १५७ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. गणेशोत्सवादरम्यान गर्दीच्या ठिकाणी, मुख्य रस्ते, चौक आदी ठिकाणी वाहतूक नियमन करण्यात येणार आहे. तसेच वेळावेळी वरिष्ठ अधिकारी अशा ठिकाणी भेट देऊन पाहणी करणार आहेत. गस्त घालण्यासाठीही वाहतूक विभागातर्फे पथक नियुक्त केले आहे. गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. १०७ जणांवर ही कारवाई झाली. अँटी गुंडा स्कॉड, छेडछाड प्रतिबंधक पथक तयार करण्यात आले आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यानही ही पथके सक्रिय राहणार असून, पोलिसांकडून चोख बंदोबस्त राहणार आहे.
घरगुती गणेशाला मंगळवारी निरोप देण्यात येणार आहे. दीड दिवसाच्या घरगुती गणेश मूर्तीचे काही भक्तांकडून घाटांवर विसर्जन करण्यात येते. अशा घाटांवर पोलीस बंदोबस्त राहणार आहे. त्यासाठी महापालिका, वाहतूक विभाग व अग्निशामक दल यांच्याशी समन्वय साधण्यात आला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
............
सीसीटीव्ही उभारण्याचे मंडळांना आवाहन
मिरवणूक, ध्वनिक्षेपक आदी विविध परवानग्या देण्यासाठी पोलीस ठाण्याच्या पातळीवर संबंधित अधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले आहेत. गणेश मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. मूर्तीच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक किंवा स्वयंसेवक तसेच गर्दी, चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून स्वयंसेवक नियुक्त करण्याच्या सूचना मंडळांना करण्यात आल्या आहेत.