लाेणावळ्यात 24 तासात 384 मिमी पाऊस ; लाेणावळा धरण ओव्हरफ्लाे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 11:54 AM2019-08-04T11:54:39+5:302019-08-04T11:55:32+5:30
गेल्या 24 तासात लाेणावळा शहरात 384 मिमी पावसाची नाेंद झाली आहे. त्यामुळे येथील अनेक घरांमध्ये पाणी गेले.
लोणावळा : लोणावळा शहरात गत 24 तासात तब्बल 384 मिमी पावसाची नाेंद झाली आहे. लोणावळा शहरातील टाटा कंपनीचे धरण पहाटे साडेपाच वाजता ओव्हरफ्लो झाले आहे. धरणाच्या सांडव्यावरुन साधारण 2 क्युसेकने पाणी इंद्रायणी नदीपात्रात येऊ लागल्याने धरणालगत असलेल्या आयएनएस शिवाजीच्या नौसेना बाग ह्या रहिवासी वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
नौसेना बागमधून वाहणार्या नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा आडकल्याने पाणी साचत सर्व वसाहतींना पाण्याचा विळखा पडला आहे. नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले असून वाहने तसेच मुलांची खेळणी पाण्यात गेली आहेत. नगरपरिषदेच्या जेसेबीच्या सहाय्याने सुरक्षा भितीच्या जाळ्या काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. तसेच नदीकाठावरील हुडको वसाहत व इंद्रायणीनगरला पुराचा धोका निर्माण झाला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास इंद्रायणी नदीपात्रालगत असलेली हुडको वसाहत व इंद्रायणीनगर भागात पुराचे पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हुडको भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हालविण्याबाबत तयारी सुरु करण्यात आली आहे. सदर ठिकाणी रोप बांधण्यात आले असून लोणावळा नगरपरिषदेची आपत्कालिन पथके, लोणावळा शहर पोलीस, टाटा कंपनीची पथके, शिवदुर्ग मित्र व आयएनएस शिवाजी यांची पथके हुडको येथे तैनात असल्याची माहिती मुख्याधिकारी सचिन पवार यांनी दिली. नांगरगाव येथिल जाधव काॅलनी, आदर्श वसाहतीमध्ये पाणी साचले असून नांगरगाव, वलवण, रायवुड, तुंगार्ली भागातील रस्त्यावर पाणी साचले आहे.
हनुमान टेकडीत घर पडले; लहान मुलाचा मृत्यु
हनुमान टेकडी येथे एक दुमजली घर खालील घरावर पडल्याने घराचे पत्रे लागल्याने एका अकरा वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यु झाला तर त्याचे वडील व बहीण जखमी झाले आहेत.