पिंपरी-चिंचवडमध्ये कर्ज देण्याच्या बहाण्याने ४० ते ४५ जणांना गंडा; तिघांना अटक
By रोशन मोरे | Published: October 3, 2022 07:42 PM2022-10-03T19:42:29+5:302022-10-03T19:43:20+5:30
तिघांना गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने जेरबंद केले....
पिंपरी : कर्ज देण्याच्या बहाण्याने ४० ते ४५ जणांची लाखोंची फसवणूक करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने जेरबंद केले. अटक केलेल्या आरोपींची नावे बालाजी उर्फ एकनाथ बळीराम घोडके (वय ३२, रा. यवत, दौंड) संग्रामसिंह अरुणराव यादव (वय ४६, रा. कोल्हापूर), राजवीर उर्फ हसन अकबर मुजावर (वय ३०, रा. कसबा बावडा, कोल्हापूर) अशी आहेत.
हॉटेल व्यावसायिकाला कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने अडीच लाखांचा गंडा घातल्या प्रकरणी पोलीस तपास करत होते. या तपासात पोलिसांना आरोपींनी ४० ते ४५ जणांकडून घेतलेले विविध बँकेचे १८५ चेक, रक्कम असलेले चेक आणि कर्जासंबंधित कागदपत्रे मिळून आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल माणिकराव पाचपुते यांना हॉटेलच्या नूतनीकरणासाठी पाच कोटींची आवश्यकता होती. त्यावेळी आरोपी बालाजी याने संग्राम यादव व मुजावर फायनान्सचे मालक यांच्याकडून पाच कोटींचे कर्ज घेऊन देतो, म्हणून प्रोसेसिंग फीच्या नावाखाली व ॲडव्हान्स हफ्ता म्हणून दोन लाख ४५ हजार रुपये घेऊन फसवणूक केली.
या प्रकरणी अमोल यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट ४ चे पोलीस पथक आरोपींचा शोध घेत बालाजी घोडके याला अटक केली. तसेच कोल्हापूर येथीन इतर आरोपींना ताब्यात घेतले.