भाजपचा ४०० पारचा नारा; त्यांना वेगवेगळ्या ग्रहांवर ८०० जागा मिळणार, आदित्य ठाकरेंचा टोला
By ज्ञानेश्वर भंडारे | Published: April 23, 2024 04:44 PM2024-04-23T16:44:29+5:302024-04-23T16:45:18+5:30
भाजपच्या वतीने अब की बार ४०० पारचा नारा दिला जातोय, मात्र या वेळी ते २०० पार देखील जाणार नाहीत
पिंपरी : भाजपच्या वतीने या निवडणुकीत ४०० पारचा नारा दिला जातोय. मात्र, भाजपला वेगवेगळ्या ग्रहांवर ८०० जागा मिळणार आहेत. महाराष्ट्रात उद्योग आले नाही तर उलट महाराष्ट्रातले उद्योग बाहेर गेले आहेत. शिंदे सरकार मुळे महाराष्ट्राचा काय फायदा झाला? असा टोला आदित्य ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे.
महाविकास आघाडीचे मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी मंगळवारी (दि. २३) उमेदवारी अर्ज भरला. वाघेरे यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे रोहित पवार, शिवसेनेचे सचिन अहिर, खासदार डॉ. अमोल कोल्हे, शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील आदी उपस्थित होते.
आदित्य ठाकरे म्हणाले, भाजपच्या वतीने अब की बार ४०० पारचा नारा दिला जात आहे. मात्र, या वेळी ते २०० पार देखील जाणार नाहीत. पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भाजपच्या वतीने हिंदू - मुस्लिम विषय काढला जात आहे. पहिल्या टप्प्यात त्यांना आपला पराभव दिसून आला आहे. भाजपच्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही. तरूणांना रोजगार मिळाला नाही. मुली-महिलांना असुरक्षित वातावरण आहे. प्रत्येक नागरिक नाखुश आहे. त्यामुळेच भारतीय जनता पक्षाच्या वतीने आता पराभव दिसत असल्याने हिंदू मुस्लिम प्रचार केला जात असल्याचा दावा ठाकरे यांनी केला. शिंदे सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्राचा विकास थांबला असल्याचा आरोप देखील आदित्य ठाकरे यांनी केला.
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची संस्कृती बिघडवली : रोहित पवार
रोहित पवार म्हणाले, चिंचवड पोटनिवडणुकीत एकमेकांच्या विरोधात असणारे आता एकत्र आले आहेत. नेते सोयीचे राजकारण करत असतील तर कार्यकर्त्यांनी काय करायचे असा सवाल मावळमधील नागरिकांना पडला आहे. महाराष्ट्रातील घरे फोडून देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील संस्कृती बिघडवली आहे. या बलाढ्य शक्तीला हरवायचे आहे, म्हणून ही निवडणूक नागरिकांनी हातात घेतली आहे. माझा भाऊ पार्थ पवारला ज्यांनी हरविले त्याचाच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अजित पवार आले आहेत. तरीही आम्ही त्यांचा पराभव करून दाखवू, असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला.
आदिल‘शहा’चे आक्रमण पळवून लावा : अमोल कोल्हे
खासदार अमोल कोल्हे म्हणाले, शिवाजी महाराजांच्या काळात आदिल‘शहा’च्या फर्मानानुसार अफजलखानाने आक्रमण केले. सध्याही तसेच आहे. दिल्लीवरून शहाचे फर्मान आले की, इथले लोक भूमिका बदलतात. त्यामुळे इतिहासातील कान्होजी जेधे व्हायचे की खंडोजी खोपडे व्हायचे ते तुम्ही ठरवा. शहराचा विकास केला म्हणून वाढपी मिरवत आहेत. मात्र, स्वयंपाक आचाऱ्यामुळे चांगला झालेला असतो. त्यामुळे स्वयंपाकी कोण आहे ते ओळखा रावणाची लंका जाळण्यासाठी हनुमानाने शेपटीची मशाल केली आणि लंका खाक केली. मातीला मातृभूमी मानतो त्या प्रत्येकाची ही निवडणूक आहे. त्यामुळे मतदान करतांना विचार करा
मोदी-शहाच्या कारभाराला जनता विटली : माणिकराव ठाकरे
माणिकराव ठाकरे म्हणाले, पहिल्या टप्प्यात निवडणुका झाल्या. यामध्ये विदर्भातील पाचही जागा निवडून येणार आहेत. त्यामुळे इंडिया आघाडी सत्तेत येणार हे सध्याचे चित्र आहे. विदर्भ, मराठवाड्यात आघाडीला मतदान जास्त होणार आहे. शरद पवार यांनी ज्यांना मोठे केले तेच पवारांचा पराभव करण्यासाठी सरसावले आहेत. भाजपने कटकारस्थान करून पक्ष फोडले. उद्धव ठाकरे, शरद पवार यांना भाजपने ज्या वेदना दिल्या त्या जनतेला झाल्या आहेत. मोदी-शहांचा कारभाराला जनता विटली आहे. जनतेला बदल हवा आहे, अशी टिकाही काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी केली.