रिंग रोखल्याने ४२ लाख वाचणार, आयुक्तांची दक्षता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 03:20 AM2018-01-31T03:20:38+5:302018-01-31T03:20:49+5:30
वाकड येथील जकात नाक्याच्या जागेसाठी सीमाभिंत बांधण्याच्या कामात रिंग झाली आहे. पात्र निविदाधारकांना निविदा पाकीट उघडू नये, अशी धमकी सत्ताधा-यांकडून दिली जात आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे यांनी केला होता. याप्रकरणाची दखल घेत आयुक्तांनी सर्वनिविदा पाकीट उघडावेत, असे आदेश दिले. त्यानंतर उर्वरित पाकिटे उघडल्याने महापालिकेचे ४२ लाख रुपये वाचले आहेत.
पिंपरी : वाकड येथील जकात नाक्याच्या जागेसाठी सीमाभिंत बांधण्याच्या कामात रिंग झाली आहे. पात्र निविदाधारकांना निविदा पाकीट उघडू नये, अशी धमकी सत्ताधा-यांकडून दिली जात आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे यांनी केला होता. याप्रकरणाची दखल घेत आयुक्तांनी सर्वनिविदा पाकीट उघडावेत, असे आदेश दिले. त्यानंतर उर्वरित पाकिटे उघडल्याने महापालिकेचे ४२ लाख रुपये वाचले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीने मंजूर केलेल्या ४२५ कोटींच्या रस्तेविकास कामांत रिंग झाल्याचे प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेले आहे. असे असताना शिवसेनेने सोमवारी आणखी एका
प्रकरणात रिंग झाल्याचा आरोप केला होता. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना
निवेदन दिले आहे. त्यामुळे आयुक्त श्रावण हर्डीकर याप्रकरणी काय निर्णय घेतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
आयुक्तांनी तक्रारीची दखल घेऊन मुख्यलेखापालांचा अहवाल, आणि तरतुदीनुसार कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सर्व निविदा उघडाव्यात असेही आदेश दिले. त्यामुळे कमी दर असणाºया राहुल कन्स्ट्रक्शनला काम मिळाले. यातील पाच ठेकेदारांपैकी राहुल कन्स्ट्रक्शनने २२ टक्के, एसएस साठे कंपनीने नऊ टक्के, यश कीर्ती असोसिएटने एक टक्के कमी दराने आणि एसबी सवई यांनी १ टक्के, पांडुरंग एन्टरप्रायजेसने २ टक्के जादा दराने निविदा भरल्या होत्या.
सर्वच निविदा उघडल्याने २२ टक्के कमी दर असणाºया राहुल कन्स्ट्रक्शनला काम मिळाले आहे. हे काम दोन कोटी ९० हजारांचे असून रिंग झाली असती, तर उर्वरित तिघांपैकी यशकीर्तीला एक टक्के कमी दराने काम दिले गेले असते. आयुक्तांनी सर्व निविदा उघडण्याचा निर्णय घेतल्याने २२ टक्के दराची निविदा पात्र धरण्यात आली. त्यामुळे सुमारे ४२ लाखांचे जनतेचे पैसे वाचले आहेत, असा दावा प्रशासनाने केला आहे.
अशी झाली निविदा प्रक्रियेत रिंग
वाकड येथील आरक्षण क्रमांक ४/११ येथील जकात नाक्याच्या जागेसाठी सीमाभिंत घालण्यात येणार आहे. त्या कामाची निविदा पालिकेने १५ ते ३० डिसेंबरला प्रसिद्ध केली. कालावधीत सहा जणांनी निविदा भरली. त्यापैकी एका ठेकेदाराने काही कागदपत्रे जोडली नव्हती. त्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्यात आले आणि पात्र निविदा धारकांची यादी १९ जानेवारीला महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली. त्यात पाच ठेकेदार पात्र ठरले होते. त्यापैकी राहुल कन्स्ट्रक्शन यांनी १८ जानेवारी व एस. एस. साठे यांनी २० जानेवारीला निविदा ही चुकीने बिड केली असून, ती उघडू नये तसेच आमची ईएमडी व पीएसडी परत मिळण्याची विनंती केली होती. त्यापैकी दोघांनी निविदा पाकीट उघडू नये, अशी पत्रे दिली आहेत. परंतु, ही पत्रे राजकीय दबावातून दिली. यामध्ये रिंग झाली आहे.
पालिकेचे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यासाठी ठेकेदारांच्या पत्रांचा विचार न करता पात्र झालेल्या सर्व निविदा उघडण्यात याव्यात, अशीही मागणी आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार मुख्य लेखापाल यांचे अभिप्राय घेऊन फेरसादर करावा, अशा सूचना दिल्या होत्या. शिवसेनेच्या आक्षेपांची दखल घेऊ असे सूचित केले होते.
वाकड येथील कामात रिंग झाल्याचा आरोप केल्यानंतर आयुक्तांनी या प्रकरणाची दखल घेतली. सर्वच निविदा उघडल्याने रिंग करणाºयांचा डाव फसला. यामुळे २२ टक्के कमी दराची निविदा स्वीकारली. त्यामुळे ४२ लाख वाचले आहेत. त्याबद्दल आयुक्तांच्या निर्णयाचे अभिनंदन. यापूर्वीच्या प्रकरणांतही असेच निर्णय आयुक्तांनी घेतले असते, तर कोट्यवधी रुपये वाचले असते.
- राहुल कलाटे, गटनेते शिवसेना