पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीत पहिल्या तिमाहीमध्ये ४३२ कोटींचा कर जमा

By ज्ञानेश्वर भंडारे | Published: July 3, 2024 04:57 PM2024-07-03T16:57:47+5:302024-07-03T16:58:10+5:30

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये एकूण मालमत्ताधारकांपैकी ५४ टक्के मालमत्ताधारकांनी मालमत्ताकर भरला

432 crores tax collected in Pimpri Chinchwad Municipal Corporation coffers in the first quarter | पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीत पहिल्या तिमाहीमध्ये ४३२ कोटींचा कर जमा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीत पहिल्या तिमाहीमध्ये ४३२ कोटींचा कर जमा

पिंपरी : महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या तिजोरीमध्ये आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये ४३२ कोटी रुपयांचा मालमत्ताकर संकलित करण्यात आला. शहरामध्ये निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमिनी आदी अशा एकूण ६ लाख ३० हजारांहून अधिक नोंदणीकृत मालमत्ता असून, यावर्षी त्यापैकी ५४ टक्के करदात्यांनी पहिल्या तिमाहीमध्येच मालमत्ताकर भरून विविध सवलतींचा लाभ घेतला आहे.

नागरिकांनी मालमत्ताकर भरण्यासाठी करसंकलन विभागाने विविध उपाययोजना राबविल्या. यामुळे नागरिकांना सवलतीबाबत माहिती होऊन नागरिकांनी पहिल्या तिमाहीमध्येच आपला मालमत्ताकर भरण्यासाठी प्राधान्य दिले आहे. सवलतीबाबत जनजागृती झाल्याने परिणामी, सन २०२४-२५ या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये एकूण मालमत्ताधारकांपैकी ५४ टक्के मालमत्ताधारकांनी मालमत्ताकर भरला.

७३ टक्के करदात्यांनी भरला ऑनलाइन...

शहरातील एकूण मालमत्ताधारकांपैकी ३ लाख ५७ हजार ११ इतक्या मालमत्ताधारकांनी ४३२ कोटींचा कर जमा केला असून त्यापैकी २ लाख ६२ हजार ५२२ इतक्या म्हणजेच ७३ टक्के मालमत्ताधारकांनी ऑनलाइन स्वरूपात कर भरून सवलतींचा लाभ घेतला आहे.

सर्वाधिक निवासी मालमत्ताधारकांनी भरला कर...

शहरातील निवासी, वाणिज्यिक आणि औद्योगिक मालमत्ताधारकांपैकी सर्वाधिक ३ लाख ११ हजार ६७ निवासी मालमत्ताधारकांनी तब्बल २६० कोटींच्या कराचा भरणा केला आहे. तसेच १७ झोनपैकी वाकडमध्ये सर्वाधिक ४९ हजार ३६ नागरिकांनी ६८ कोटी, तर पिंपरीनगर झोनमध्ये सर्वात कमी ३ हजार ९८२ मालमत्ताधारकांनी फक्त ३ कोटींचा कर भरला आहे. असे करसंकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.

शहरातील सर्व जबाबदार, प्रामाणिक आणि जागरूक करदात्यांनी यावर्षीही पहिल्या तिमाहीमध्ये कर भरून सवलतींचा लाभ घेतला आहे. त्याबद्दल सर्व जागरूक करदात्यांचे मनापासून आभार मानतो. शहरातील करदात्यांसाठी विभागाने जाहीर केलेल्या विविध योजनांचा लाभ घेत कराचा भरणा केल्याने शहराच्या प्रगतीमध्ये करदात्यांचा मोलाचा वाटा आहे. नागरिकांनी येत्या काळामध्येही शहराच्या प्रगतीसाठी कररूपी योगदान द्यावे. - शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

Web Title: 432 crores tax collected in Pimpri Chinchwad Municipal Corporation coffers in the first quarter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.