जागेचा ताबा न देता व्यावसायिकाची ४४ लाखांची फसवणूक; पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 08:32 AM2022-08-24T08:32:38+5:302022-08-24T08:33:37+5:30
ही घटना १२ नोव्हेंबर २०१६ रोजी कासारसाई येथे घडली....
पिंपरी : रस्त्याच्या कामाच्या बदल्यात पैसे न देता जागेचा ताबा देतो, असे सांगून जागेचा ताबा दिला नाही. यात व्यावसायिकाची ४४ लाख २० हजार ११८ रुपयांची फसवणूक केली. ही घटना १२ नोव्हेंबर २०१६ रोजी कासारसाई येथे घडली.
कुंदन रामचंद्र काटकर (वय ३३, रा. रावेत) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आचल डेव्हलपर्सचे मालक अमित देवराम कलाटे (वय ३२, रा. वाकड चौक, पुणे) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्लॉटिंग डेव्हलपमेंटमधील रस्त्याच्या कामाच्या बदल्यात अमित कलाटे यांनी फिर्यादी यांना ४४ लाख २० हजार ११८ रुपये स्टॅम्पड्युटीसह देणे होते. मात्र पैसे न देता कलाटे यांनी फिर्यादींना कासारसाई येथील साडेसहा गुंठे जागा दाखवली. पैशांच्या मोबदल्यात त्या जागेचा ताबा देतो, असे फिर्यादीला सांगितले. मात्र कलाटे यांनी जागेचा ताबा न देता तसेच पैसेही न देता फिर्यादी यांची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक संदीप देशमुख तपास करीत आहेत.