दोन वर्षांत पीएमपी बसच्या अपघातांत ४७ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 01:55 AM2019-02-27T01:55:54+5:302019-02-27T01:55:57+5:30

अनफिट बस : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात वर्षभरात झाले ११० अपघात

47 people die in PMP bus accident in two years | दोन वर्षांत पीएमपी बसच्या अपघातांत ४७ जणांचा मृत्यू

दोन वर्षांत पीएमपी बसच्या अपघातांत ४७ जणांचा मृत्यू

Next

शीतल मुंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पीएमपी बसच्या अपघातांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याचप्रमाणे बस सातत्याने ‘ब्रेक डाऊन’ होत आहेत. त्यामुळे पीएमपीच्या बस ‘फिट’ नसल्याचे दिसून येत आहे. पीएमपीच्या अपघातांत दोन वर्षांत ४७ जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. यात एका वर्षात पीएमपीच्या ११० अपघातांमध्ये २१ जणांचा मृत्यू झाला असल्याचे आकडेवारीतून निदर्शनास आले आहे.


पुणे महानगर परिवहन महामंडळ पीएमपीमध्ये दररोज पीएमपीने प्रवास करणाऱ्यांची संख्या ११ ते १२ लाखांपर्यंत आहे. मात्र मोडकळीस आलेल्या बस, अपुऱ्या बसची संख्या, बसच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी एकाच वेळी प्रवास करतात. त्यामध्ये पीएमपीच्या बसचे वाढलेले अपघात या अपघातांमध्ये अनेक नागरिकांना नाहक जीव गमवावा लागत आहे.


सन २०१६-२०१७ मध्ये तब्बल २६ जणांचा पीएमपी बसच्या अपघातामध्ये बळी गेलेला आहे. अपघातामध्ये ४१ जण गंभीर जखमी झालेले आहेत. ५७ जण किरकोळ जखमी झालेले आहेत. पीएमपी बसच्या या अपघातांमध्ये अनेक जण आयुष्यभरासाठी अपंग झाले आहेत. २०१७-२०१८ या वर्षात पीएमपी बसचे ११० अपघात झालेले आहेत. या अपघातांमध्ये २१ जणांचा बळी गेलेला आहे. ३६ जण गंभीर जखमी आणि ४३ जण किरकोळ जखमी झालेले आहेत.
बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघातांत होतेय वाढ पीएमपीचे अपघात होण्याचे प्रमाण मोठे आहे. मात्र प्रत्येक वेळी पीएमपीचे चालकच दोषी असतील, असे नाही. पीएमपी बसला ‘ओव्हर टेक’ करण्याच्या प्रयत्नात अनेक अपघात होतात. त्यामध्येही तरुणांची संख्या जास्त आहे. शहरातील
रस्त्यांची असलेली स्थिती, मेट्रोच्या कामामुळे वाढलेली वाहतूककोंडी, रस्त्यावरील खड्डे, बेशिस्त वाहनचालक, वाहनचालवताना मोबाइलचा वापर, अचानक समोरून येणारी वाहने यामुळे पीएमपीच्या अपघातांमध्ये वाढ होत आहे.


आरटीओच्या दुर्लक्षाने प्रदूषणात वाढ
भंगार झालेल्या पीएमपी बस रस्त्यावर धावतात. त्यामुळे प्रदूषणातदेखील वाढ होते. बस सतत ब्रेक डाऊन होतात. भर रस्त्यात बस बंद पडण्याचेही प्रमाण अधिक आहे. अशा बसचा वापर करणे व्यवहार्य नसताना आणि सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असतानाही त्याबाबत गांभीर्य दिसून येत नाही. पीएमपी प्रशासन याबाबत उपाययोजना करण्याबाबत उदासीन असल्याचे दिसून येते. असे असले तरी धोकादायक आणि प्रदूषण वाढविणाºया बस शहरभर धावत असताना आरटीओ प्रशासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. पीएमपीच्या अशा बसवर कारवाई करून, आरटीओने त्यांना बंदी घालणे आवश्यक आहे.
 

पीएमपी प्रशासन अपघातांचे समर्थन करत नाही. अपघात होतात हे मान्यच आहे. त्याची कारणेही तशीच आहेत. झालेल्या अपघातांमध्ये पीएमपी चालकाचे व रिपोर्टची संपूर्ण माहिती प्रशासन घेत असते. पीएमपी चालकाचे म्हणणे प्रशासन ऐकून घेते. पीएमपीचालक दोषी असल्यास त्याच्यावर
कारवाई होते. अपघात रोखण्यासाठी पीएमपी प्रशासन प्रयत्न करत असते.
- सुभाष गायकवाड,
जनसंपर्क अधिकारी, पीएमपी

पीएमपी बसच्या अपघातासाठी कोणालाही एकाला दोषी धरणे चुकीचे आहे. अपघात झाला की, लोक पीएमपी बस फोडतात. त्यामुळे पीएमपीचे नुकसानदेखील होते. चालकाला मारहाण केली जाते. अपघातात केवळ चालकाचाच दोष आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. कानात हेडफोन घालून वाहने चालवणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अपघात होण्याची कारणे अनेक आहेत.
- डॉ. आरती साळुंखे, प्रवासी

शहरात वाहतूककोंडीची समस्या मोठी आहे. त्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामध्येही पीएमपीचे अपघात नेहमीच होतात. रस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागते. पीएमपी बसला ‘ओव्हर टेक’ करण्याच्या प्रयत्नात मोठ्या प्रमाणात अपघात होतात. मेट्रोच्या कामामुळे रस्ता वापरण्यासाठी अत्यंत कमी आहे. एकावेळी एकच पीएमपी बस जाऊ शकते इतका अरुंद रस्ता आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. - खाजा शेख, प्रवासी

Web Title: 47 people die in PMP bus accident in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.