सेवानिवृत्त ‘एसीपी’ला ४९ लाखांचा गंडा
By नारायण बडगुजर | Published: May 30, 2024 10:01 PM2024-05-30T22:01:02+5:302024-05-30T22:01:17+5:30
फसवणूक प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुून्हा दाखल
पिंपरी : सेवानिवृत्त सहायक पोलिस आयुक्तांना शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर गुंवणुकीचे पैसे इतरत्र गुंतवणूक करून कंपनी, जमीन, गाडी, कार्यालय असे खरेदी केले. तसेच करारनाम्याप्रमाणे व्याज देण्यास टाळाटाळ करून सेवानिवृत्त ‘एसीपीं’ची ४९ लाख रुपयांची फसवणूक केली. थेरगाव आणि रहाटणी येथे १ जून २०२२ ते २९ मे २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला.
ज्ञानेश मुरलीधर देवडे (६१, रा. कोथरुड, पुणे) यांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. थेरगाव येथील इरिच इंटरनॅशनल कंपनी, प्रदीप मारुती शेळके (५०, रा. संतोषनगर, थेरगाव), शहाजी दत्तात्रय बारणे (४४, रा. पद्मजी पेपर मिल जवळ, थेरगाव) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्ञानेश देवडे हे सेवानिवृत्त सहायक पोलिस आयुक्त आहेत. संशयित हे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून गुंतवणूकदारांना चांगला परतावा देतात, अशी जाहिरात फिर्यादी ज्ञानेश देवडे यांना पाहिली. त्यानुसार त्यांनी संशयितांशी संपर्क साधला. त्यांनी त्यांच्या कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडून त्या गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो, असे सांगितले. तसेच ज्ञानेश यांनी गुंतवणूक केलेल्या रकमेवर काही परतावा देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. ज्ञानेश यांचा मुलगा व मुलगी यांनी इरिच इंटरनॅशनल कंपनीमध्ये गुंतवूणक केली. त्यांना सुरवातीला थोडे व्याज देऊन त्यांचाही विश्वास संपादन केला.
संशयितांनी फिर्यादी ज्ञानेश आणि इतर गुंतवणूकदार यांनी गुंतवणूक केलेल्या पैशांतून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी इतरत्र गुंतवणूक करून कंपनी, जमीन, गाडी, कार्यालय खरेदी करून स्वत:चा आर्थिक फायदा करून घेतला. फिर्यादी ज्ञानेश यांनी गुंतवलेल्या पैशांवरील करारनामा (वचनचिठ्ठी) प्रमाणे व्याज मागितले. मात्र, संशयितांनी व्याज देण्यास टाळाटाळ करून उडवाउडवीची उत्तरे दिली. फिर्यादी ज्ञानेश व इतर गुंतवणूकदार यांनी विश्वासाने गुंतवणूक केलेल्या ४९ लाख रुपयांचा अपहार करून संशयितांनी त्यांची फसवणूक केली. तसेच फिर्यादी ज्ञानेश आणि इतर गुंतवणूकदार यांच्याकडून स्वीकारलेल्या गुंतवणुकीवर शासनास जीएसटी न भरता शासनाचीही फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस निरीक्षक (गुन्हे) विठ्ठल साळुंखे तपास करीत आहेत.