आळंदीच्या विकास आराखड्यास ४ महिन्यांत मंजुरी
By admin | Published: March 2, 2015 01:19 AM2015-03-02T01:19:20+5:302015-03-02T04:07:31+5:30
आळंदी नगरपरिषदेने सादर केलेल्या शहर विकास आराखड्यास राज्य शासनाने तत्त्वत: मंजुरी दिली आहे. त्यातील ईपीबाबतची सुनावणी नगररचना विभाग संचालकांकडे
पुणे : आळंदी नगरपरिषदेने सादर केलेल्या शहर विकास आराखड्यास राज्य शासनाने तत्त्वत: मंजुरी दिली आहे. त्यातील ईपीबाबतची सुनावणी नगररचना विभाग संचालकांकडे सुरू असून, ती पुढील तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर एका महिन्यात त्याची छाननी करून मान्यता देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
आळंदी येथे रसिकलाल एम. धारिवाल फाउंडेशनच्या वतीने बांधण्यात आलेल्या वारकरी संप्रदाय प्रशिक्षण केंद्र, भक्तनिवास व सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, गोविंदगिरी महाराज, विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील, सुरेश गोरे, शरद सोनवणे, लक्ष्मण जगताप, मंदा म्हात्रे, नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, फाउंडेशनचे अध्यक्ष रसिकलाल धारिवाल, उपाध्यक्षा शोभा धारिवाल, जान्हवी धारिवाल, मुंबई मराठी ज्ञातीच्या फळ व्यापार धर्मदाय ट्रस्टचे अध्यक्ष भगवान थोरात आदी व्यासपीठावर उपस्थित होते. रसिकलाल धारिवाल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्री म्हणाले, की आळंदी नगरपालिकेच्या हद्दवाढीच्या प्रस्तावावर एका आठवड्यात निर्णय घेऊ. आळंदीच्या पाण्याच्या प्रश्न लक्षात घेऊन त्यासाठी काय प्रयत्न करता येईल यावर विचार सुरू आहे. आगामी अधिवेशनात त्यावर बैठक बोलवून भामा आसखेड धरणातून किंवा पुण्यातून आळंदीला पाणी कसे देता येईल, याचा प्रश्न मार्गी लावू आणि त्यासाठी निधीही देऊ. त्याचबरोबर आळंदीला यात्रेसाठी देण्यात येणाऱ्या ६५ लाख रुपये अनुदानात वाढ करून तो २ कोटी करण्याचा निर्णयही लवकरच घेऊ.
इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत ते म्हणाले, राज्यातील नद्यांचे ९० टक्के प्रदूषण हे महापालिका, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेकडून नदीत सोडण्यात आलेल्या सांडपाण्यामुळे होत आहे. जोपर्यंत नदीत सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारले जात नाहीत तोपर्यंत नद्या प्रदूषणमुक्त करणे अशक्य आहे. हे करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येईल.
वारकरी संप्रदायाने समाजाला ऊर्जित अवस्थेत ठेवण्याचे काम केले आहे. त्या परंपरेला आधुनिकतेची जोड देऊन वैभवात भर टाकण्याचे काम या वास्तूने केले आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
रसिकलाल धारिवाल म्हणाले, समाजात काम करत असताना त्याचे आपण काहीतरी देणे लागतो, या विचारानेच आम्ही कामे करीत आहोत. आळंदीत इंग्लिश मीडियम स्कूल आणि पंढरपूरमध्ये भक्तनिवास उभारण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी त्यांनी या वेळी केली. शोभा धारिीाल यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य आणि विविध क्षेत्रांत करण्यात आलेल्या कामांची माहिती दिली. दरम्यान, मुख्यमंत्री इतक्या दूरवरून प्रथमच आळंदीत आले, पण माऊलींचे दर्शन न घेता गेल्याने वारकऱ्यांमध्ये नाराजी होती. याबाबत त्यांची इच्छा असतानाही पावसामुळे थांबता आले नसल्याचे सांगण्यात आले.(प्रतिनिधी)