आयटीयन्स तरुणांसाठी ५-१० लाखांचे पॅकेजही कमीच; कमाईच्या हव्यासापोटी गमवतायेत लाखो
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 03:59 PM2023-05-08T15:59:28+5:302023-05-08T15:59:49+5:30
ऑनलाईन काम देऊन सुरुवातीला पैसे दिले जातात, मात्र नंतर अवघड टास्क देत पैसे उकळले जातात
पिंपरी : कृतिका (बदललेले नाव) आयटीमध्ये गेल्या चार वर्षांपासून काम करते आहे. तिला पॅकेज देखील चांगले आहे. मात्र, शनिवार, रविवार दोन दिवस सुट्यांमध्ये अधिकचे पैसे कमवता येतील यासाठी तिने एक पार्ट टाईम जॉब ऑनलाईन सर्च केला. तिच्या व्हॉट्सॲपवर एक लिंक आली. त्यामध्ये उल्लेख होता की तुम्हाला व्हिडीओ पाठवले जातील तुम्ही फक्त त्या व्हिडीओला लाईक करायचे आणि कमेंट करायचे. तुम्हाला एका तासाचे दीड हजार रुपये मिळतील. अधिक तास काम केल्यास अधिक पैसे. कृतिकाने काम सुरू केले आणि स्वत:च्या बँक खात्यातील २७ लाख रुपये गमावले. कृतिकासारखे अनेक आयटीतील तरुण अशा फसव्या ‘टास्क फ्रॉड’ला बळी पडत आहेत.
कृतिका फसवली गेली तो सायबर गुन्हा ‘टास्क फ्रॉड’चा प्रकार आहे. टास्क फ्रॉड म्हणजे तुम्हाला ऑनलाईन काम दिले जाते. ते काम करत असताना काम पूर्ण केले म्हणून काही पैसे देखील तुमच्या अकाउंटरवर जमा केले जातात. त्यानंतर पुढील टास्क दिले जाते त्यामुळे तुम्हाला अधिकच पैसे मिळतील असे आमिष दाखवले जाते. टास्कमध्ये पैसे गुंतवले तर त्यातून देखील चांगले पैसे मिळतील असे सांगितले जाते. त्यामुळे टास्क पूर्ण करणारा त्यात आपल्याकडील पैसे गुंतवतो. मात्र, गुंतवलेली रक्कम जसजशी वाढत जाते तसेतसे अवघड टास्क देत ते टास्क अपूर्ण आहे पूर्ण करण्यासाठी अधिक पैसे भरा, असे सांगून जास्तीत जास्त पैसे उकळले जातात. अनेक जण हे पैसे भरण्यासाठी उसनवारी करत मित्रांकडून, नातेवाईकांडून पैसे घेत असल्याचे देखील अनेक प्रकरणांमध्ये दिसून येते आहे.
आयटीयन्सचीच फसवणूक का?
- नवीन जॉब शोधण्याचे सर्वाधिक प्रमाण.
- कमी वेळेत अधिक पैसे कमवण्याचा हव्यास.
- लाइफ स्टाईल मेंटेंन ठेवण्यासाठी कामाचा शोध.
- ट्रेडिंगमधून पैसे मिळतात तसेच यातून देखील मिळतील असा गैरसमज.
- सायबर सुरक्षिततेत बाबत अज्ञान.
- आठवड्यात दोन दिवस सुटी असल्याने इतर काम करण्याचा आत्मविश्वास.
- ज्या कंपनीसाठी पार्टटाईम काम करत आहोत तिच्या सत्यतेबाबत पडताळणी न करणे.
सायबर सिक्युरिटीबाबत जनजागृती करणे आवश्यक
आयटीत सर्वांना समान पॅॅकेज नसते. त्यामुळे अधिक कमाईच्या प्रयत्नात अनेक जण ‘टास्क फ्रॉॅर्ड’ला बळी पडतात. शिवाय वेगळं काम करून आपली ओळख निर्माण करण्याचीदेखील ते धडपडत करत असतात, अशावेळी सायबर भामटे याचा गैरफायदा घेत फसवणूक करतात. आयटीत आहेत म्हणजे सायबर सिक्युरिटीची माहिती असेलच असे नाही. त्यामुळे आयटीयन्समध्ये सायबर सिक्युरिटीबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. - अन्वर मुलाणी, सायबरतज्ज्ञ
...या भ्रमापासून आयटीयन्सनी दूर राहायला हवे
कामासाठी पैसे मागत असतील तर फॅक्टचेक करायला हवेत आणि वेळेत थांबायला हवे. कमी वेळेत अधिक पैशाचे आमिष दाखवत असतील तरीदेखील कंपनीची सत्यता पडताळून पाहणे गरजेचे आहे. शिवाय आपल्याला सर्व माहिती आहे या भ्रमापासून आयटीयन्सनी दूर राहायला हवे. - संदीप गदादे , सायबर गुन्हे तपासतज्ज्ञ