कायदेशीर कागदपत्रांशिवाय देशात घुसखोरी करणाऱ्या ५ बांगलादेशी नागरिकांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 09:35 AM2024-01-23T09:35:37+5:302024-01-23T09:35:57+5:30
धक्कादायक म्हणजे ५ नागरिकांपैकी तिघांनी गोवा येथून पासपोर्टही काढल्याचे समोर आले आहे
पिंपरी : कोणत्याही कायदेशीर कागदपत्रांशिवाय देशात घुसखोरी करून वास्तव्य करणार्या पाच बांगलादेशी नागरिकांना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दहशतवाद विरोधी पथकाने आणि निगडी पोलिसांनी जेरबंद केले. निगडी येथील अंकुश चौकातील साईनाथ नगरमधील काळभोर चाळीत शनिवारी (दि. २०) रात्री नऊच्या सुमारास ही कारवाई केली. धक्कादायक म्हणजे संशयितांपैकी तीन जणांनी गोवा येथून पासपोर्टही काढल्याचे समोर आले आहे. या पासपोर्टद्वारे ते लवकरच परदेशात जाण्याच्या तयारीत होते.
रॉकी सामोर बरूआ (वय २८), जयधन अमीरोन बरूआ (२८), अंकुर सुसेन बरूआ (२६), रातुल शील्फोन बरूआ (२८), राणा नंदन बरूआ (२५, सर्व रा. चित्तागोंग, बांगलादेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह साईनाथ सर (रा. चंदननगर, पुणे), जिकू दास उर्फ जॉय चौधरी (रा. चंदननगर, पुणे व मडगाव, गोवा) या दोघांच्या विरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस अंमलदार सुयोग लांडे यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व संशयित हे बांगलादेशी नागरिक आहेत. त्यांनी कोणत्याही वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय तसेच भारत - बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकार्यांच्या लेखी परवानगीशिवाय भारतातील पश्चिम बंगाल -सिलीगुडी येथे घुसखोरी केली. तेथे त्यांनी बनावट जन्मदाखला आणि इतर कागदपत्रांद्वारे आधारकार्ड बनवले. त्यानंतर सर्वजण निगडी येथील अंकुश चौक, साईनाथनगर येथील चाळीत बेकायदेशीररित्या वास्तव्य करत होते. याठिकाणी त्यांनी आधारकार्डवरील पत्ते बदलून पुण्यातील पत्ते टाकले. बनावट कागदपत्रांचा वापर करीत तीन संशयितांनी गोवा येथून पासपोर्टही काढून घेतले. इतर दोन संशयितांचे पासपोर्ट लवकरच येणार होते. याबाबत दहशतवाद विरोधी पथकाला माहिती मिळाली. त्यांनी छापा टाकून पाच संशयितांना पकडले.
मोशी येथेही पकडले होते बांगलादेशी
पिंपरी - चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत मोशी येथेही मागील वर्षी दोन बांगलादेशी नागरिकांना पकडले होते. तसेच भोसरी येथे बनावट आधारकार्ड तयार करण्याचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला होता. त्यामुळे शहरात आणखी घुसखोर असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत पोलिसांकडून ‘सर्च ऑपरेशन’ सुरू आहे.
पोलिसांकडून १४ बांगलादेशीवर कारवाई
निगडी, भोसरी, चिखली आणि महाळुंगे परिसरातून आतापर्यंत एकूण १४ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. त्यामध्ये सहा महिलांचा समावेश आहे. बांगलादेशी घुसखोरांमुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.