निगडी ओटा स्कीममधील ५ बोगस लाभार्थ्यांना अटक
By Admin | Published: April 24, 2017 04:51 AM2017-04-24T04:51:53+5:302017-04-24T04:51:53+5:30
चिंचवड महापालिकेच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांसाठी राबविण्यात आलेल्या
पिंपरी : चिंचवड महापालिकेच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांसाठी राबविण्यात आलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या इमारतीत ज्यांना सदनिका मिळाल्या. त्यातील काही लाभार्थ्यांनी बनावट कागदपत्रे सादर केली असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याविरूद्ध महापालिकेने गुन्हा दाखल केला असून पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवपुत्र शरणाप्पा नाटेकर (४५, रा. गुरूदत्त अपार्टमेंट, दळवीनगर, निगडी), सलीम मेहमदहुसेन बागवान (४६, रा. ओटा स्कीम, निगडी), इजहारअली शेख (४२, रा. ओटा स्कीम, निगडी), उत्तम गिरमा मंडलिक (४०, रा. ओटा स्कीम, निगडी) आणि नजमुन्निसा रशीद खान (५५, रा. ओटा स्कीम, निगडी) या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. महापालिकेचे तत्कालीन सहायक आयुक्त सुभाष सावन माछरे (५८, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
जवाहर नेहरू राष्ट्रीय पुनर्विकास योजनेंतर्गत निगडी पेठ क्रमांक २२ मध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या इमारती साकारण्यात आल्या. शहरातील सुमारे १८ हजार झोपडीधारकांसाठी हा प्रकल्प राबविण्यात आला. त्यातील १४२८ झोपडीधारकांसाठी निगडी ओटास्कीम येथे इमारती उभारण्यात आल्या. या योजनेत घर मिळविण्यासाठी काहींनी चक्क खोटी आणि बनावट कागदपत्रे सादर केली. महापालिकेची दिशाभूल करून बनावट कागदपत्रांच्या आधारे अनेकांनी घरे मिळविली आहेत. ही बाब चौकशीत निष्पन्न झाली. त्यामुळे महापालिकेने गंभीर दखल घेतली. लाभार्थ्यांची चौकशी करून ज्यांनी बनावट कागदपत्र सादर केली होती, त्यांच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी त्या पाच जणांना अटक केली आहे.
न्यायालयात हजर केले असता, २४ एप्रिलपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (प्रतिनिधी)