उद्योगनगरीत पाच लाखांचा गुटखा जप्त
By Admin | Published: October 9, 2016 04:34 AM2016-10-09T04:34:32+5:302016-10-09T04:34:32+5:30
गुटखा बंदी असतानाही बेकायदा गुटखा विक्रीेसाठी पिंपळे सौदागर व पिंपरी येथील गोडाऊनमध्ये ठेवण्यात आला होता. पिंपरी पोलिसांच्या युनिट तीनच्या पथकाने शनिवारी
पिंपरी : गुटखा बंदी असतानाही बेकायदा गुटखा विक्रीेसाठी पिंपळे सौदागर व पिंपरी येथील गोडाऊनमध्ये ठेवण्यात आला होता. पिंपरी पोलिसांच्या युनिट तीनच्या पथकाने शनिवारी कारवाई करून सुमारे पाच लाखांचा गुटखा जप्त केला.
पिंपळे सौदागर आणि पिंपरी या भागांत बेकायदेशीर गुटखा विक्री होत असल्याची माहिती युनिट तीनच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने पिंपळे सौदागर येथील दोन गोडाऊनवर छापा टाकला. पोलीस चौकीच्या जवळच हे गोडाऊन आढळून आले. गोडाऊनमध्ये प्लॅस्टिकच्या पोत्यात व कागदी बॉक्समध्ये हा गुटखा भरण्यात आला होता. सुमारे दोन टेम्पो इतका गुटखा पोलिसांनी जप्त केला. यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा पिंपरीकडे वळविला.
पिंपरीतील एका गोडाऊनवर दुपारी छापा टाकण्यात आला. या ठिकाणी देखील लाखो रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. रात्री उशिरापर्यंत पोलिसांची ही कारवाई सुरू होती. दरम्यान, छापा टाकण्यात आलेली गोडाऊन एकाच मालकाची असल्याचे समजते.
(प्रतिनिधी)
उद्योगनगरीतील बेकायदा गुटख्यावरील ही सर्वांत मोठी कारवाई आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत कारवाईचे काम सुरू आहे.
- सीताराम मोरे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक.