पावसामुळे अडोशाला उभे राहिले अन् काळाने घाला घातला; डोक्यावर होर्डिंग कोसळले, ५ मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 10:45 PM2023-04-17T22:45:01+5:302023-04-17T22:45:12+5:30
समीर लॉन चौक रावेत, अग्निशमन विभाग-सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांचे मदतकार्य, तीन तास मदतकार्य सुरू
देवराम भेगडे
किवळे : पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी पावसाने झोडपून काढले. पावसामुळे अडोशाला उभे राहिले अन् डोक्यावर होर्डींग कोसळले. त्यात पाच जणांचा बळी गेला आहे. तर दोन जण जखमी आहेत, ही घटना घडली आहे. बंगळुरू महामार्गावरील रावेतमध्ये. जखमी रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अग्निशमन विभाग आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मदतकार्य केले. रात्री आठपर्यंत येथे वाहतूक कोंडी झाली होती. या भागातील वीजुपरठा खंडीत झाला आहे.
पिंपरी-चिंचवडमधील उपनगरांमध्ये सोमवारी सायंकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान वादळी पावसाने झोडपून काढले. आज दानादान उडविली. त्यामुळे वाकड आणि किवळे, रावेत मधील झाडे उन्मळून पडली आहेत. पावसामुळे महामार्गावरून प्रवास करणाºयांची तारांबळ उडाली असल्याचे दिसून आले.
कोठेझाला अपघात
बंगळुरू-मुंंबई महामार्गावरील पवनानदी सोडल्यानंतर सेवा रस्त्याने जाताना समीर लॉन चौकाच्या अलीकडे एका बांधकाम प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्या प्रकल्पाकडून महामार्गावर येताना रस्त्यावर होर्डींग मागील बाजूस असणाºया एक हॉटेल आणि पंक्चरवाल्याची टपरी आहे. तेथील अडोशाला नागरीक उभे राहिले होते.
पंधरा मिनिटात पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक दाखल
अपघात पाहणाऱ्या नागरिकांनी पोलीस आणि अग्निशमन विभागाला दूरध्वनी करून घटनेची माहिती दिली. तर देहूरोड आणि रावेत पोलीसांचे पथक पंधरा मिनिटात घटना स्थळी पोहोचले. तोपर्यंत पिंपरी-चिंचवडवरून चार बंब दाखल झाले. तसेच पीएमआरडीएचाही बंब दाखल झाला. होर्डींगचा सांगाडा मोठा आल्याने तो हटवायचा कसा, असा प्रश्न अग्निशमन विभागापुढे होता. त्यानंतर सुरूवातीला दोघांना बाहेर काढण्यात आले. आणि खासगी रूग्णवाहिकेतून रूग्णालयात हलविले.
सामाजिक कार्यकर्ते सरसावले
सेवा रस्त्यावरील होर्डींग हटविण्यासाठी क्रेनची आवश्यकता होती. मात्र, जवळच अरविंद सांडभोर यांचे क्रेनची सुविधा आहे. त्यानंतर चार क्रेन आणण्यात आले. तसेच आजूबाजूचे सामजिक कार्यकर्ते मदतीला धावून आले. त्यांनी गॅस कटरने सांगाडे तोडण्यास सुरूवात करण्यात आली.
पोलिस आयुक्तांनी दिली भेट
घटनास्थळास सायंकाळी सातच्या सुमारास पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांनी भेट दिली. तसेच घटनास्थळी असणाºया नागरीकांशी संवाद साधला. घटनेची माहिती घेतली. तसेच त्यानंतर पावणेआठच्या सुमारास महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, जितेंद्र वाघ यांनी घटनास्थळास भेट दिली.
महामार्गावर वाहतूककोंडी
महामार्गालगत होर्डींग पडल्याने बघ्याची गर्दी मोठ्याप्रमाणावर झालेली होती. तर सेवा रस्त्यावर वाहतूककोंडी झाली. वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पोलीस निरिक्षक सुनील पिंजन, गणेश आदरवाडकर यांनी आणि कर्मचाºयांनी प्रयत्न केले.
तीस बाय चाळी फुटाचे होर्डींग
७० बाय ४५ फुटाचा बेस असून त्यावर तीस बाय चाळीसचे होर्डींग आहे. त्यासाठी जड लोखंड वापरले आहे.
महावितरणचा फोन बंद
घटनास्थळापासून तीनशे मीटरवर महावितरणचे कार्यालय आहे. अपघात झाल्यानंतर या भागातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. पोलिस आणि अग्निशामक दलाच्या अधिकाºयांनी महावितरणकडे संपर्क साधला मात्र, संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे दिवस मावळल्यानंतरही या भागात वीज नव्हती. अग्निशमन विभागाच्या गाड्याचे हेडलाईट लावून काम करण्यात आले. साडेआठच्या सुमारास मदतकार्य संपले. नऊपर्यंत येथील वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता.
असा घटनाक्रम
सायंकाळी सव्वा पाच -होर्डींग कोसळले.
सायंकाळी साडेपाच वाजता-अग्निशमन दल, पोलीस दाखल, दोन जखमींना हलविले.
सायंकाळी पावणे सहा -खासगी क्रेन पाचारण. लोखंड तोडून तिघांना बाहेर काढले. त्यानंतर दोघांना रुग्णालयात हलविले.
सायकाळी सात वाजता-पोलिस आयुक्त घटनास्थळी
रात्री साडेआठला-महापालिका अधिकारी.
रात्री नऊवाजेपर्यंत-लोखंड हटविण्याचे काम सुरू.