पिंपरीत 'पन्नाशी'पार होमगार्डच्या नशिबी 'ऑफ ड्युटी'; बेरोजगारीमुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 05:16 PM2021-06-09T17:16:36+5:302021-06-09T17:22:51+5:30
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत १४८ तर महापालिकेत १२७ असे २७५ होमगार्ड आहेत.
नारायण बडगुजर -
पिंपरी : नवीन असलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे गृहरक्षक दलाची (होमगार्ड) मदत घेण्यात येत आहे. कोरोना महामारी व लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी होमगार्डस्ची मोठी मदत होत आहे. मात्र, यातील ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या होमगार्डस्ला ड्युटी देण्यात येत नाही. परिणामी त्यांना बेरोजगार म्हणून राहावे लागत आहे.
गेल्या वर्षीची लाट ओसल्यानंतर यंदा मार्चमध्ये दुसरी लाट आली. त्या पार्श्वभूमीवर शासनाने कठोर निर्बंध लागू केले. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस यंत्रणेवर मोठा ताण आला. त्यामुळे होमगार्डस्ची मदत घेण्यात येत आहे. पोलीस आयुक्तालयांतर्गत केलेली नाकाबंदी, बंदोबस्त, लसीकरण केंद्र, महापालिका तसेच शासकीय रुग्णालये, कोविड सेंटर, शासकीय कार्यालय, आदी ठिकाणी होमगार्डस्ला कर्तव्य बजवावे लागत आहे. त्यांना प्रतिदिवस ५७० रुपये मानधन तसेच १० ते १२ तास ड्यूटी केल्यास १०० रुपये जेवणाचा भत्ता मिळतो.
पुणे तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हवेली तालुक्यात येते. शहरी भाग असलेल्या या हवेली तालुक्यात ८८६ नोंदणीकृत होमगार्ड आहेत. त्यात महिला २२० असून ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले १३० होमगार्डस् आहेत. जास्त वय असलेल्यांना कोरोना विषाणूंचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे त्यांना ड्युटीवर बोलावण्यात येऊ नये, असे निर्देश आहेत. त्यामुळे हवेली तालुक्यातील १३० होमगार्डस्ला ड्यूटी देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोरोना महामारीत त्यांचा रोजगार गेला. वय जास्त असल्याने त्यांना इतर कामे किंवा उद्योग-व्यवसाय करणे सहज शक्य नाही.
कोरोनामुळे साप्ताहिक परेड बंद
कोरोना महामारी व लॉकडाऊनमुळे निर्बंध लागू केल्याने होमगार्डस्ची भरती बंद आहे. तसेच त्यांचे प्रशिक्षणही बंद आहे. तसेच साप्ताहिक परेडही होत नाही. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. अनलॉक होत असताना कामकाज पूर्ववत होण्याची अपेक्षा होमगार्डस्कडून व्यक्त केली जात आहे.
९८ टक्के लसीकरण
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत होमगार्डला एसएमएस पाठवण्यात आले होते. त्यामुळे पहिल्या टप्प्यातच त्यांना पहिला व दुसरा डोस देण्यात आला. हवेली तालुक्यातील ९८ टक्के होमगार्डचे लसीकरण झाले. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका रुग्णालये तसेच इतर ठिकाणच्या केंद्रांमध्ये त्यांच्यासाठी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
आम्ही जगायचे कसे?
कोरोना संसर्गाची भीती आहेच. वरिष्ठ अधिकारी व पोलीस अधिकारी यांच्याकडून सातत्याने मनोबल उंचावले जात आहे. आणखी काही सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे.
- संजय ताटे, होमगार्ड, वाकड
वय ५० पेक्षा जास्त असलेल्या काही होमगार्डस्ला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यातील काही जण आयुष्यभर होमगार्डस् म्हणून सेवा देत आहेत. मात्र कोरोनामुळे आम्हाला ड्यूटी देण्यात आलेली नाही. आम्ही काय करायचे?
- विजय भालेराव, होमगार्ड, बाणेर
गेल्या ३३ वर्षांपासून होमगार्ड म्हणून काम केले. आयुष्यभर सेवेत राहिलो. आता वय पन्नाशीपार गेले. या वयात दुसरी नोकरी कोण देईल, मुलांचे शिक्षण, लग्न कसे करायचे, त्यात महामारीत घरी बसावे लागत आहे, आम्ही जगायचे कसे?
- राम लहाडे, होमगार्ड, हडपसर
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत १४८ तर महापालिकेत १२७ असे २७५ होमगार्ड आहेत. त्यात महापालिकेकडे २९ महिला होमगार्ड आहेत. गृहरक्षक दलाची वेबसाईट आहे. त्यावरून सर्व कामकाज ऑनलाइन होते. त्यानुसार होमगार्डस्ला ड्यूटी देण्यात येते.
- नीलेश खिलारे, प्रभारी अधिकारी, पिंपरी-चिंचवड
हवेली तालुक्यातील नोंदणीकृत होमगार्ड - ८८६
महिला होमगार्ड – २२०
५० पेक्षा जास्त वय असलेले होमगार्ड – १३०
सध्या सेवेत असलेले - ७००