वीज पडून ५० शेळ्या-मेंढ्या ठार
By admin | Published: June 13, 2017 04:10 AM2017-06-13T04:10:27+5:302017-06-13T04:10:27+5:30
सुदवडी (ता. मावळ) हद्दीत श्रीक्षेत्र भंडारा डोंगराच्या पायथ्याला वीज पडून सुमारे ५० शेळ्या व मेंढ्या मृत्युमुखी पडल्या. १५ शेळ्या-मेंढ्या जखमी झाल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
देहूगाव/तळेगाव दाभाडे : सुदवडी (ता. मावळ) हद्दीत श्रीक्षेत्र भंडारा डोंगराच्या पायथ्याला वीज पडून सुमारे ५० शेळ्या व मेंढ्या मृत्युमुखी पडल्या. १५ शेळ्या-मेंढ्या जखमी झाल्या आहेत. यात सुमारे साडेचार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
ही घटना सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती कळताच सुदुंबरे गावचे माजी उपसरपंच बाळासाहेब गाडे यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर तहसीलदार रणजीत देसाई व तलाठी मनीषा निंबोळकर यांना माहिती देण्यात आली. तलाठी निंबोळकर यांनी रात्री पावणेआठच्या सुमारास पंचनामा केला. भंडारा डोंगराच्या पायथ्याला बाळू गोपाळा शिंगटे व त्याचा भाऊ अंबू गोपाळा शिंगटे यांचा वाडा आहे. सायंकाळी शेळ्या व मेंढ्या चारून ते आपल्या वाड्याकडे चालले असता पाऊस सुरू झाला.
कृषी अधिकाऱ्यांकडून होणार पाहणी
निवाऱ्याला बाळू व अंबू आपल्या शेळ्या व मेंढ्यासह थांबले होते. प्रचंड प्रकाशाचा झोतासह वीज कडाडली आणि काही कळण्याच्या आत वीज पडली. उपसरपंच बाळासाहेब गाडे, सुदवडीचे सरपंच सदानंद टिळेकर, माजी सरपंच सुरेखा मोईकर,तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब कराळे, शांताराम दरेकर उपस्थित होते. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास मंडल अधिकारी, कृषी अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी सकाळी नऊच्या सुमारास घटनेची पाहणी करण्यास येणार असल्याची माहिती गाडे यांनी दिली.