लोकसभा निवडणूक अलर्ट; पोलीस नाकाबंदीत वाहनातून ५० लाख जप्त
By नारायण बडगुजर | Updated: March 26, 2024 23:17 IST2024-03-26T23:16:59+5:302024-03-26T23:17:48+5:30
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी - चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये नऊ ठिकाणी तपासणी नाके उभारले आहेत

लोकसभा निवडणूक अलर्ट; पोलीस नाकाबंदीत वाहनातून ५० लाख जप्त
पिंपरी : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे. यात वाहनांची तपासणी केली जात आहे. या तपासणी दरम्यान उर्से टोल नाका येथे एका चारचाकी वाहनामध्ये आढळून आलेली ५० लाख रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली.
पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी - चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये नऊ ठिकाणी तपासणी नाके उभारले आहेत. पुणे -मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाका येथे देखील तपासणी नाका आहे. या नाक्यावर मंगळवारी (दि. २६) शिरगाव पोलिस वाहनांची तपासणी करत असताना त्यांना एका चारचाकी वाहनामध्ये ५० लाख रुपये रोख रक्कम मिळून आली. पोलिसांनी रोकडबाबत विचारणा केली असता संबंधित वाहन चालकास योग्य खुलासा करता आला नाही. त्यामुळे पोलिसांनी रोकड जप्त केली. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी केली जात असून कायदेशीर कार्यवाही केली जाणार असल्याचेही पोलिस उपायुक्त बांगर यांनी सांगितले.