फ्लॅट विक्री व्यवहारात ग्राहकाची ५० लाखांची फसवणूक; वाकडमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 08:21 PM2023-07-10T20:21:15+5:302023-07-10T20:22:08+5:30
याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल...
पिंपरी : फ्लॅट विक्रीचा व्यवहार ठरवून त्या बदल्यात ५० लाख ५४ हजार २०० रुपये घेतले. मात्र, व्यवहार न करता फ्लॅटची परस्पर इतरांना विक्री करून ग्राहकाची फसवणूक केली. याप्रकरणी वाकडपोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. फसवणुकीचा हा प्रकार ३० मार्च २०२२ ते २६ जून २०२३ या कालावधीत वाकड येथे घडला.
अजिंक्य रवींद्र ओझा (वय ३२, रा. वाकड) यांनी याप्रकरणी २६ जून रोजी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. रूपेश छोटालाल शेठ (वय ५५, रा. कोरेगाव पार्क), श्री उतीन चव्हाण (वय ४०, रा. कोरेगाव पार्क) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपेश शेठ हा शेठ अँड पोपट एंटरप्रायजेसचा भागीदार असून, श्री उतीन चव्हाण हा मॅनेजर आहे. आरोपींनी कंपनीद्वारे वाकड येथील टियारा सोसायटीतील फ्लॅट क्रमांक १२०१ या फ्लॅटचा फिर्यादी सोबत एक कोटी १८ लाख ८ हजार रुपयांचा व्यवहार ठरवला. आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीकडून आरटीजीएसद्वारे ३४ लाख ४ हजार २०० रुपये तर रोख स्वरूपात १६ लाख ५० हजार रुपये असे एकूण ५० लाख ५४ हजार २०० रुपये घेतले. मात्र, आरोपींनी व्यवहार न करता फिर्यादीला फ्लॅटची विक्री केली नाही. फिर्यादीकडून घेतलेली रक्कमही परत केली नाही. तसेच आरोपींनी इतर दोघांना या फ्लॅटची परस्पर विक्री करून फिर्यादीची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी वाकड पोलिस तपास करीत आहेत.