९० क्रमांकासाठी मोजले ५० हजार, पसंतीच्या क्रमांकांना मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 02:17 AM2019-01-21T02:17:50+5:302019-01-21T02:18:00+5:30
हौसेला मोल नसते असे म्हटले जाते. याचाच प्रत्यय शुक्रवारी पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आला.
वाकड : हौसेला मोल नसते असे म्हटले जाते. याचाच प्रत्यय शुक्रवारी पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आला. वाहनांसाठी घेण्यात येणाऱ्या चॉईस क्रमांकाच्या लिलावातून आरटीओ कार्यालयाला तब्बल सहा लाख २५ हजार ३५९ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये सर्वाधिक ९० क्रमांकाला ५० हजार ४०० रुपयांची किंमत मिळाली.
पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनांच्या क्रमांकासाठी एकूण २४७ अर्ज दाखल झाले होते. त्यांपैकी २५ क्रमांकासाठी लिलाव झाला, तर अन्य १८० क्रमांक ठरलेली सरकारी किंमत मोजून नागरिकांनी खरेदी केले. असे एकूण २०५ वाहन क्रमांकांचे वाटप शुक्रवारी करण्यात आले.
या लिलावात सर्वाधिक ९० या क्रमांकाला ५० हजार ४०० रुपयांची बोली मिळाली. या ९० क्रमांकाची शासकीय किंमत (बोली) केवळ ५ हजार रुपये इतकी आहे. त्याच्या तुलनेत ४५ हजार ६०० रुपये अधिक मिळाले, तर या लिलाव प्रक्रियेत नेहमी स्पर्धा असणाºया अनेक क्रमांकांना या वेळी मागणी आली नाही. १ क्रमांकाला देखील या वेळी बोली लागू शकली नाही.
दरम्यान, १८० क्रमांक लिलावाविना सरकारी किमतीत गेल्याने त्यातून १९ लाख २७ हजार ५०० रुपये मिळाले. वाहन
मालकांचा मॅजिक बेरीज म्हणजेच १, ३, ७, ९ अशी बेरीज येणाºया आकड्यांना अधिक मागणी
असल्याचे पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी सांगितले.