५० वर्षांपूर्वीची ‘दाय-इची’ कंपनी बंद; गुजरातला स्थलांतर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 03:16 AM2019-02-01T03:16:30+5:302019-02-01T06:50:06+5:30
प्रवेशद्वारावर कामगारांचा ठिय्या
पिंपरी : कासारवाडी-नाशिक फाटा येथील दाय-इची कारकारिया लिमिटेड ही रासायनिक उत्पादन क्षेत्रात अग्रेसर असलेली ५० वर्षांपूर्वीची कंपनी बंद केली आहे. व्यवस्थापनाने २५ जानेवारी २०१९ ला प्रवेशद्वारावर नोटीस लावली आहे. गुजरातमध्ये स्थलांतर करण्यासाठी कंपनी बंद केल्याचे नोटिशीत नमूद केले आहे. त्यामुळे प्रवेशद्वारावर कामगारांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. कंपनीत २७ कामगार कायमस्वरूपी नोकरीस होते, तर शंभरजण कंत्राटी आहेत. देय रकमा मिळाव्यात, अशी कायमस्वरूपी आणि निवृत्त कामगारांची आग्रही मागणी आहे.
दाय-इची कारकारिया ही कंपनी १९६३ मध्ये कासारवाडी, नाशिक फाटा येथे सुरू झाली. विविध कंपन्यांसाठी रासायनिक माल पुरवठा करणारी ही कंपनी होती. कंपनीत सुरुवातीला ३५० कामगार होते. नंतर कामगार निवृत्त होत गेले. सन १९८७ नंतर कंपनीने भरती केली नाही. कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून उत्पादन प्रक्रिया सुरू ठेवली. त्यामुळे सद्य:स्थितीत केवळ २७ कामगार कायमस्वरूपी होते.
त्यातही दोन कामगार संघटनांचा मान्यताप्राप्त संघटनेकरिता वाद सुरू आहे. कंपनीतील सुरुवातीची दाय- इची कामगार संघटना आणि नंतर २००८ मध्ये स्थापन केलेली हिंद कामगार संघटना अशा दोन संघटना कार्यरत होत्या. हिंद कामगार संघटनेचे ११, तर दुसऱ्या संघटनेचे १६ सदस्य आहेत. हिंद कामगार संघटनेने मान्यताप्राप्त संघटना म्हणून मान्यता मिळावी, कामगारांचा करार करावा, या मागणीसाठी उच्च न्यायालयात दावा दाखल आहे. हिंद कामगार संघटनेचे नेते कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे.
कामगारांनी कंपनीच्या स्थलांतरास विरोध केला होता. मात्र कंपनी बंदचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला. कंपनीने आम्हाला देय रकमा दिल्या आहेत. परंतु मोबदला योग्य प्रकारे मिळाला नाही. कामगारांना योग्य प्रकारे मोबदला द्यावा, या मागणीसाठी कंपनी प्रवेशद्वारावर आंदोलन सुरू ठेवले आहे. - संजय काशीद, युनिट अध्यक्ष, हिंद कामगार संघटना
कासारवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढली आहे. घातक रसायनांचा वापर होत असल्याने महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार ही कंपनी लाल श्रेणीअंतर्गत वर्गीकृत केली. इथिलिन ऑक्साईड अशा घातक आणि अत्यंत ज्वलनशील रसायनाचा वापर निवासी क्षेत्रात धोकादायक आणि जोखमीचा आहे. त्यामुळे येथील कंपनी गुजरातमधील भरुच या औद्योगिक क्षेत्रात स्थलांतरीत केली आहे.
- राजेश मुळे,
सहायक महाव्यवस्थापक, मानव संसाधन आणि औद्योगिक संबंध, दाय-इची कंपनी