पालिका अर्थसंकल्पात पाचशे कोटींची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 02:11 AM2018-03-28T02:11:43+5:302018-03-28T02:11:43+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१८-१९ या वर्षाच्या अर्थसंकल्पाला सर्वसाधारण सभेत मंगळवारी मान्यता देण्यात आली. ग्राह्य ९९५ उपसूचनांपैकी ९८१ स्वीकारल्या असून

500 crore increase in municipal budget | पालिका अर्थसंकल्पात पाचशे कोटींची वाढ

पालिका अर्थसंकल्पात पाचशे कोटींची वाढ

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१८-१९ या वर्षाच्या अर्थसंकल्पाला सर्वसाधारण सभेत मंगळवारी मान्यता देण्यात आली. ग्राह्य ९९५ उपसूचनांपैकी ९८१ स्वीकारल्या असून, ५०५ कोटींची वाढ सुचविली असून, त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प ५७६७ कोटींपर्यंत पोहोचला आहे. अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिकेचा मूळ ३५०० कोटी व जेएनएनयूआरएमसह ५२३५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प १५ फेब्रुवारीला स्थायी समितीला सादर केला होता. त्याच दिवशी स्थायी समिती सदस्यांनी अर्थसंकल्पावर चर्चा करत त्यामध्ये उपसूचनांद्वारे २७ कोटी रुपयांची वाढ केली. त्यानंतर तीन वेळा सभा तहकूब करून मंगळवारी सुमारे साडेसात तास अर्थसंकल्पावर चर्चा घडवली. चर्चेअंती कोट्यवधी रुपयांच्या हजारहून अधिक उपसूचना जोडल्या. चार मूळ उपसूचनांना १११२ पोट उपसूचना जोडल्या होत्या. त्यानंतर या उपसूचनांचे एकत्रीकरण करून लेखा विभागाकडे छाननी करण्यात आली.
या संदर्भातील सर्वसाधारण सभा सुरुवातीला तहकूब करण्यात आली. त्यानंतर नगरसचिव उल्हास जगताप यांनी उपसूचनांचे वाचन केले. ते म्हणाले, ‘‘एकूण उपसूचनांपैकी ९९५ उपसूचना ग्राह्य ठरल्या आहेत. ११७ सूचना अग्राह्य ठरल्या. ९९५ ग्राह्य उपसूचनांपैकी ९८१ उपसूचना स्वीकृत केल्या, तर १४ नाकारल्या आहेत.’’ त्यानंतर स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे यांनी उपसूचनांसंदर्भात मनोगत व्यक्त केले. स्वीकृत उपसूचनांपैकी ४४४ उपसूचना शून्य तरतुदीच्या आहेत. शहर विकास आराखडा आणि अखर्चित निधीतून ५४५ कोटी रुपयांची तरतूद करावी, असे स्पष्ट केले आहे. त्यापैकी ४५ कोटी १९ लाख रुपयांच्या तरतुदी शहर विकास आराखड्यातून आणि ४९१ कोटी ३१ लाख रुपये रक्कम अखर्चित निधीतून वळविण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात ५०५ कोटींची वाढ झाली आहे. पालिकेचा अर्थसंकल्प ५७६७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यावर महापौर काळजे यांनी, फेरफार, बदलांसह अर्थसंकल्पास मंजुरी दिल्याचे जाहीर केले.

Web Title: 500 crore increase in municipal budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.