'वायसीएमएच'च्या कपडे धुलाईत ५२ लाखांचा वाढीव खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 05:17 PM2022-08-15T17:17:08+5:302022-08-15T17:20:02+5:30
पिंपरी : यशवंतराव चव्हाण स्मृती वायसीएम रुग्णालयात कपडे धुलाईसाठी असलेली तरतूद कमी पडत आहे. परिणामी सात महिन्यांच्या कपडे धुलाईसाठी ...
पिंपरी : यशवंतराव चव्हाण स्मृती वायसीएम रुग्णालयात कपडे धुलाईसाठी असलेली तरतूद कमी पडत आहे. परिणामी सात महिन्यांच्या कपडे धुलाईसाठी ठेकेदारावर ५२ लाखांचा वाढीव खर्च करण्यात येणार आहे.
वायसीएम रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय यांच्यासह रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या कपड्यांची धुलाई ठेकेदारामार्फत करण्यात येते. यासाठी मध्यवर्ती साहित्य भांडार विभागामार्फत निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार १ जानेवारी २०२० पासून करारनामा करण्यात आला.
तीन वर्षे कालावधीकरिता वायसीएम रुग्णालयातील कपडे धुलाई करण्यासाठी त्यांना २ कोटी १० लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली. त्यानुसार, मे २०२० पर्यंत २ कोटी ९ लाख ६२ हजार रुपये खर्च झाला आहे. या कामाची मुदत डिसेंबर २०२२ मध्ये संपुष्टात येणार आहे. त्यामुळे होणाऱ्या वाढीव खर्चास मंजुरी घेणे आवश्यक आहे. मासिक सरासरी धुलाई बिल ७ लाख ५० हजार रूपये ग्राह्य धरून जून २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीसाठी ५२ लाख ५० हजार रुपये वाढीव खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार, या खर्चास मान्यता मिळण्यासाठी हा विषय स्थायी समिती सभेसमोर ठेवण्यात येणार आहे.
रुग्णालयाच्या लॉण्ड्री विभागातील धुलाई मशीन बंद पडल्या पडल्या आहेत. त्यामुळे रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी तातडीने मशीन दुरुस्त करण्याबाबत निर्देश ठेकेदारांना दिले. त्यानुसार, त्यांनी धुलाई मशीन दुुरुस्त केली. या दुरुस्तीचे ७ लाख ६८ हजार रुपयांचे दरपत्रक त्यांनी सादर केले. या दरपत्रकाबाबत बायोमेडिकल इंजिनिअरिंग विभागाचा अभिप्राय घेण्यात आला. त्यानुसार, निविदा न मागवता आणि करारनामा न करता थेट पद्धतीने ७ लाख ६८ हजार रुपये देण्यात येणार आहेत.