Pimpri Chinchwad: आर्मी अधिकारी असल्याचे सांगून व्यावसायिकाला ६ लाखांना गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 20:30 IST2023-07-26T20:27:37+5:302023-07-26T20:30:01+5:30
पिंपळे निलख येथे १३ ते १८ जुलै या कालावधीत हा प्रकार घडला...

Pimpri Chinchwad: आर्मी अधिकारी असल्याचे सांगून व्यावसायिकाला ६ लाखांना गंडा
पिंपरी : आर्मी अधिकारी असल्याचे सांगून व्यावसायिकाकडून पाच ड्रम ट्रॉली ऑर्डर केल्या. आर्मीच्या नियमाप्रमाणे अगोदर व्यावसायिकाकडून पैसे घ्यावे लागतील, असे सांगत पाच लाख २२ हजार रुपये घेत व्यावसायिकाची फसवणूक केली. पिंपळे निलख येथे १३ ते १८ जुलै या कालावधीत हा प्रकार घडला.
अजित लालासो शिंदे (वय ४६, रा. पिंपळे निलख) यांनी याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संदीप रावत, कुलदीप सिंग, कुणाल चौधरी यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आर्मी ऑफिसर असल्याचे सांगून फिर्यादीच्या दुकानातून ५७ हजार ८४० रुपये किमतीच्या पाच ड्रम ट्रॉली ऑर्डर केल्या.
त्यानंतर आर्मीच्या नियमाचे कारण सांगून फिर्यादीकडून गुगल पे द्वारे २० हजार रुपयांचे पाच ट्रांजेक्शन, तसेच १७ हजार ८२० रुपयांचे दोन ट्रांजेक्शन केले. त्यानंतर आयएमपीएसद्वारे दोन बँक खात्यांवर एक लाख ९३ हजार ४६० रुपये असे एकूण पाच लाख २२ हजार ५६० रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादीला त्यांचे पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली. आरोपींनी अशाप्रकारे फसवणूक करण्यासाठी आर्मीच्या नावाने बनावट खाते बनवले असल्याचे पोलीस तपासात समोर आले. पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुनील तांबे तपास करीत आहेत.