भोसरीतील ६ तरुणांना अटक
By admin | Published: June 9, 2015 05:42 AM2015-06-09T05:42:08+5:302015-06-09T05:42:08+5:30
रोहन राजेंद्र भुरुक (वय २८) याच्या खून प्रकरणी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ६ जणांना अटक केली आहे.
चाकण : मुटकेवाडी ( ता. खेड ) येथे १ जून रोजी झालेल्या रोहन राजेंद्र भुरुक (वय २८) याच्या खून प्रकरणी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ६ जणांना अटक केली असून आरोपींना ७ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे, यातील चाकण मधील दोन प्रमुख सूत्रधार आरोपी फरार आहेत. हा खून किरकोळ भांडणाचा राग व जमीन खरेदी- विक्री व्यवसायातून झाल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलिस निरीक्षक राम जाधव व उपनिरीक्षक अंकुश माने यांनी दिली. आरोपींकडून एक पिस्तुल, एक गावठी कट्टा व फरार आरोपींच्या गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाक्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या गुन्ह्यातील चाकणमधील दोन मुख्य सुत्रधारासह ४ संशयित पळून गेले आहेत़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आबा उर्फ ज्ञानेश्वर फुलचंद तांदळे (वय २३), श्रीधर लक्ष्मण पवार (वय १९), निलेश नागराजन पिल्ले (वय ३२), शशिकांत पंडित जगताप (वय २६), स्वप्नील सावळाराम बोकड (वय २३), सतीश अर्जुन पाटील (वय २३, सर्व रा़ सदगुरुनगर, भोसरी ) यांना आज ( ता. ८ ) मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. पिल्ले हा गोट्या धावडेच्या टोळीतील व अंकुश लांडगे खून प्रकरणातील आहे. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली होती. याबाबतची अधिक माहिती अशी कि, चाकणमधील मुटकेवाडी येथे सोमवारी (दि.१ जून ) रोजी सकाळी अकराच्या सुमारास रोहन राजेंद्र भूरूक याच्यावर दोघांनी गोळीबार करून खून केला होता. जमीन खरेदी-विक्रीच्या वादातूनच हा खून झाल्याचा पोलिसांचा अंदाज खरा ठरला असून पोलिसांनी लक्ष केंद्रित केलेले दोन प्रमुख सूत्रधार आरोपी फरारी झाले आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलिस निरीक्षक राम जाधव यांच्या मार्गदशर्नाखाली उपनिरीक्षक अंकुश माने हे पुढील तपास करीत आहेत. सात दिवसात खुनाचा गुन्हा उघड करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळून भोसरीतून अटक केली. या दोन तपास पथकात वरील अधिकाऱ्यांसह सहायक निरीक्षक सतीश घोडघर, पोलिस हवालदार मिरगे, शरद माने, संतोष मोरे, मोरेश्वर इनामदार, पृथ्वी पाटील, सुभाष राउत, सचिन गायकवाड, गणेश महाडिक, चंदू वाघ, दत्ता बनसोडे यांचा समावेश होता.
(वार्ताहर)
-------------
पोलिसांनी या प्रकरणातील प्रमुख संशयितांवर लक्ष केंद्रित केले होते. मात्र ते दोघे चाकण परिसरातून फरारी झाल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. हे दोन्ही प्रमुख सूत्रधार चाकण परिसरातील असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके पाठविण्यात आली आहेत. किरकोळ भांडण व जमीन खरेदी विक्रीच्या वादातून हा खून झाल्याचे स्पष्ट होत आहे.