दहशतीच्या घटनांत ६० जणांवर ‘मोक्का’
By admin | Published: November 30, 2015 01:48 AM2015-11-30T01:48:20+5:302015-11-30T01:48:20+5:30
दहशतवादी हल्ल्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये, यासाठी पोलिसांनी शहरातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पिंपरी : दहशतवादी हल्ल्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये, यासाठी पोलिसांनी शहरातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आठ महिन्यांत ६० गुन्हेगारांवर मोक्कांतर्गत कारवाई केली आहे, अशी माहिती सहायक पोलीस आयुक्त मोहन विधाते यांनी दिली.
पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या काही दिवसांत स्थानिक गुन्हेगारांकडून दहशत माजविण्याचे प्रकार घडले. नंग्या तलवारी, शस्त्र घेऊन परिसरात फिरून दहशत पसरविणे, वाहनांची तोडफोड करणे, घरांवर दगडफेक अशी कृत्य करणाऱ्या टोळक्यांना पोलिसांनी चपराक दिली आहे. नेहरूनगर, मिलिंदनगर, आकुर्डी या परिसरातील स्थानिक गुंडांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली आहे.
नेहरूनगरमधील वीटकर टोळी, रिंकू चौहान टोळी, तसेच आकुर्डीतील सोन्या काळभोर टोळीतील गुंडांवर पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. भोसरीत धुडगूस घालणाऱ्या सोन्या काळभोर टोळीतील २२ गुंडांवर एकाच वेळी मोक्काअंतर्गतची कारवाई करण्यात आली. आठ महिन्यांत अशा प्रकारे ६० गुन्हेगारांना मोक्का लावला आहे.
शहरात स्थानिक पातळीवर संघटितपणे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांमुळे सामाजिक स्वास्थ्याला बाधा पोहोचू लागली आहे. त्यामुळे परिमंडल तीन पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या अखत्यारित आठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत
पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईला प्राधान्य दिले आहे. स्थानिक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्याने संघटित गुन्हेगारीची दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना वचक बसली आहे, असे विधाते यांनी सांगितले. (प्रतिनिधी)