पिंपरी-चिंचवड शहरात ७५ दिवसांत ६८ हजार जणांनी घेतला बूस्टर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 08:04 PM2022-10-04T20:04:23+5:302022-10-04T20:05:20+5:30
मोफत बूस्टर डोस लसीकरण मोहीम ७५ दिवसांसाठी होती...
पिंपरी : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारने १८ ते ५९ वर्षे वयोगटातील नागरिकांना मोफत बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला होता. मोफत बूस्टर डोस लसीकरण मोहीम ७५ दिवसांसाठी होती.
पिंपरी - चिंचवड शहरात या ७५ दिवसांमध्ये ६८ हजार ३६९ जणांनी बूस्टर डोस घेतला आहे. आतापर्यंत शहरातील १८ ते ५९ वयोगटातील १४ लाख ७० हजार ५१६ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. यातील ६८ हजार ३६९ जणांनी ७५ दिवसांत बूस्टर डोस घेतला आहे. यावरून बूस्टर डोस घेण्याकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याची स्थिती आहे.
मोफत बूस्टर मोहिमेपूर्वी महापालिका केंद्रावर फक्त ६० वर्षांवरील नागरिक, फ्रंटलाईन वर्कर्स, आरोग्य कर्मचारी यांनाच मोफत डोस दिला जात होता. इतरांना बूस्टर घेण्यासाठी खासगी रुग्णालयात पैसे द्यावे लागत होते. परिणामी बूस्टर घेण्याला कमी प्रतिसाद मिळत होता. परंतु त्यानंतर १८ वर्षांवरील सर्वाना बूस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. ही मोहीम १५ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात आली.
बूस्टर डोस घेणाऱ्यांची संख्या
वयोगट घेणाऱ्यांची संख्या
४५-५९ : ३१,६४८
१८- ४५ : ८०,१९१
आरोग्य कर्मचारी : २५,५९२
६० वर्षांवरील : ६५,१०९
बूस्टरला कमी प्रतिसाद मिळण्याची कारणे
- कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने भीती झाली कमी.
- दोन डोस घेतले तरी चालते, असा अनेकांचा समज.
- लसीकरण केंद्रांवर रांगेत उभे राहण्याचा कंटाळा
- बूस्टर डोस कधी घ्यायचा याची अनेकांना माहितीच नाही
महापालिकेकडे उपलब्ध साठा
कोविशिल्ड : १००
कोव्हॅक्सिन : १,६००
कोर्बेव्हॅक्स : ८९४०