वासुली, मोशीत सात लाखांचा गुटखा जप्त; पोलिसांनी दोन कारवायांमध्ये दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2021 09:44 PM2021-08-07T21:44:31+5:302021-08-07T21:44:37+5:30
७ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी : वासुली आणि मोशी येथे प्रतिबंधित गुटख्याचा साठा व विक्रीप्रकरणी केलेल्या दोन कारवायांमध्ये दोघांना पोलिसांनी अटक केली. तर, दोन जणांवर गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून ७ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली.
वासुली येथील कारवाईत रामाराम कर्माराम चौधरी (वय २५, रा. खालुंब्रे, ता. खेड) आणि रानाराम चंदाराम देवासी (वय ३८, रा. वासुली, ता. खेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ओम बिष्णोई (वय ४५, रा. खालुंब्रे, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वासुली येथे आरोपींचे महालक्ष्मी किराणा दुकान आहे. आरोपींनी संगनमताने किराणा मालाच्या दुकानात व मोटारीत गुटख्याचा साठा केल्याचे आढळून आले.
मोशीतील कारवाईत बुंदाराम मिश्राराम देवासी (वय ३८, रा. बोठहाडेवाडी, मोशी) याच्यासह अल्पवयीन आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी गुटख्याचा साठा व विक्री करत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार, शुक्रवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास बोऱ्हाडेवाडी येथील पुण्याई सुपर मार्केट व आरोपी राहत असलेल्या खोलीवर छापा टाकला. त्यावेळी गुटख्याचा साठा केल्याचे समोर आले. त्याच्याकडून १४ हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला.