पिंपरी शहरात एकाच दिवसांत सातजणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह; कोरोना बाधितांची संख्या ६१
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 09:38 PM2020-04-18T21:38:39+5:302020-04-18T21:39:37+5:30
पिंपरी चिंचवड परिसरात मागील काही दिवसांपासून शहरातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ
पिंपरी : शहरात सलग अकराव्या दिवशी कोरोना रुग्णाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. शनिवारी एकाच दिवशी तब्बल सात जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले असून त्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामध्ये चार पुरुष आणि तीन स्त्रीयांचा समावेश आहे. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 45 वर पोहचली आहे. आजपर्यंत शहरातील 61 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर, 15 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजचे पॉझिटीव्ह रुग्ण संभाजीनगर, रुपीनगर, चऱ्होली परिसरातील आहेत. त्यामुळे चऱ्होली, रुपीनगर परिसर आजपासून सील केला आहे.
पिंपरी चिंचवड परिसरात मागील काही दिवसांपासून शहरातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज एकाचदिवशी सात जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये 12 वर्षाच्या मुलासह 35, 38 आणि 21 वय वर्ष असलेले चार पुरुष रुग्ण आहेत. तर, 10 वर्षाच्या मुलीसह 30 आणि 62 वर्षाच्या महिलेला कोरोनाची लागण झाला आहे. एकाच दिवशी सातरुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.
........................
रुपीनगर, संभाजीनगर, च-होली परिसरातील रुग्ण
पॉझिटिव्ह आलेले रुग्ण रुपीनगर, संभाजीनगर, च-होली परिसरातील आहेत. त्यामुळे रुपीनगर, च-होली हा परिसर आज रात्री 11 वाजल्यापासून सील केला जाणार आहे. संभाजीनगर यापुर्वीच सील केला आहे. सील केलेल्या भागात पुढील आदेशापर्यंत प्रवेश आणि नागरिकांना बाहेर पडण्यास बंदी आहे. या भागातील नागरिकांनी तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.