७२ सदनिकाधारकांची फसवणूक; पोर्शे अपघात प्रकरणातील विशाल अग्रवालवर हिंजवडीत गुन्हा दाखल
By नारायण बडगुजर | Published: June 10, 2024 03:00 PM2024-06-10T15:00:53+5:302024-06-10T15:01:49+5:30
अग्रवाल आणि त्याच्या साथीदारांनी एका बांधकाम प्रकल्पामध्ये ७२ सदनिकाधारकांना ठरवून दिलेल्या सोयी सुविधा दिल्या नाहीत
पिंपरी : पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणातील विशाल अग्रवाल आणि त्याच्या साथीदारांवर हिंजवडीपोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. अग्रवाल आणि त्याच्या साथीदारांनी एका बांधकाम प्रकल्पामध्ये ७२ सदनिकाधारकांना ठरवून दिलेल्या सोयी सुविधा दिल्या नाहीत. बावधन येथील नॅन्सी को ऑप हौसिंग सोसायटीत १ जानेवरी २००७ ते ९ जून २०२४ या कालवधीत फसवणुकीचा हा प्रकार घडला.
नॅन्सी ब्रह्मा असोसिएटस या प्रकल्पाचे विकसक विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल, राम कुमार अग्रवाल, विनोद कुमार अग्रवाल, नंदलाल किमतानी, आशिष किमतानी आणि इतर संशयितांच्या विरोधात फसवणुकीसह महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्ट नुसार गुन्हा दाखल केला. विशाल अरुण अडसूळ (४२, रा. नॅन्सी ब्रह्मा रेसिडेन्सी को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, बावधन, पुणे) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. ९) हिंजवडीपोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन येथील नॅन्सी ब्रह्मा रेसिडेन्सी को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये फिर्यादी विशाल अडसूळ आणि इतर ७१ जणांनी संशयितांकडून सदनिका खरेदी केल्या. सदनिका आणि इतर सोयीसुविधा देण्यासाठी ठरलेली रक्कम सर्व सदनिकाधारकांनी विकासकांना दिली. सोसायटीतील ७२ जणांना झालेल्या व्यवहारात विकासकांनी नॅन्सी ब्रह्मा को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, बावधन खुर्द या सोसायटीच्या मालकीच्या असणाऱ्या पार्किंग आणि ॲमिनीटीजची जागा व मोकळी जागा सोसायटीला देणे बंधनकारक होते. असे असताना त्यांनी त्या प्रकल्पात एकूण तीन सोसायट्या तयार केल्या.
प्रत्येक सोसायटीला एकाच ठिकाणची ॲमिनीटीची आणि मोकळी जागा नकाशामध्ये दाखवली. नकाशामध्ये इतर लोकांच्या मदतीने वेळोवेळी फेरबदल करून नकाशे मंजूर करून घेतले. सोसायटीच्या सभासदांची कोणतीही परवानगी न घेता विकासकांनी सोसायटीच्या जागेवर विंटेज टॉवर आणि विंटेज हाय या नावाने दोन इमारती बांधल्या. विंटेज टॉवर ११ मजली इमारत असून त्यात ६६ व्यावसायिक कार्यालये तर विंटेज हाय या १० मजली इमारतीमध्ये २७ सदनिका आणि १८ दुकाने बांधून नॅन्सी ब्रम्हा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड या सोसायटीतील ७२ सदनिका धारकांचा विश्वासघात करून फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ पांचाळ तपास करीत आहेत.