साॅफ्टवेअर इंजिनियरला ७७ लाख ५० हजारांचा गंडा; ‘आयपीओ’ मधून जास्त नफ्याच्या आमिषातून फसवणूक
By नारायण बडगुजर | Published: March 26, 2024 07:57 PM2024-03-26T19:57:47+5:302024-03-26T19:58:21+5:30
एकदा गुंतवणूक केल्यावर पुन्हा गुंतवणूक करण्यासाठी बँकाकडून कर्जही घेतले
पिंपरी : ‘आयपीओ’मधून जास्त नफा मिळण्याच्या आमिषाने साॅफ्टवेअर इंजिनियरला गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर कोणताही परतावा न देता इंजिनियरची ७७ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली. थेरगाव येथे ७ डिसेंबर २०२३ ते ७ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला.
हिंजवडी येथील आयटी कंपनीत नोकरीस असलेल्या ४६ वर्षीय साॅफ्टवेअर इंजिनियरने याप्रकरणी सोमवारी (दि. २५) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. जिमीत मोदी, धनंजय सिहा, मिका चोपडा या संशयितांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे साॅफ्टवेअर इंजिनियर आहेत. ते घरी असताना फेसबुकवरून त्यांना व्हाॅटसअपवरील एका ग्रुपची लिंक आली. त्यांनी लिंकवर क्लिक करून ग्रुपमध्ये सहभागी झाले. त्या ग्रुपमध्ये जिमीत व धनंजय हे शेअर मार्केटबाबत माहिती देत होते. त्यांचा सहयोगी म्हणून मिका चोपडा हे काम पाहत होता. त्याबाबत त्यांनी शेअर मार्केटबाबत मार्गदर्शनासाठी ऑनलाइन क्लास घेण्याचे सांगून त्या क्लासची लिंक तयार केली. त्यातील मार्गदर्शनानुसार फिर्यादी स्वत:च्या खात्यावर शेअर मार्केटमध्ये गुंतवूणक करत होते. त्यानंतर संशयितांनी फिर्यादीला एक ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी ॲप डाउनलोड केले. या ॲपवरून जास्त नफा मिळेल व आयपीओ मिळण्याच्या जास्त संधी आहेत, असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
फिर्यादीला वेगवेगळ्या बँक खात्यावर रक्कम भरण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादीने एकूण ७७ लाख ५० हजार रुपये भरले. त्यांनी भरलेली रक्कम आणि त्यावरील नफा संशयितांनी डाउनलोड करण्यास सांगितलेल्या ॲपवर दिसत होती. ही सर्व रक्कम दोन कोटींपर्यंत असल्याचे ॲपवर दिसत होते. त्यामुळे फिर्यादीने त्यांनी गुंतवणूक केलेली रक्कम तसेच नफ्याची रक्कम ॲपवरून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यासाठी ३५ लाख रुपये कर भरावा लागेल, असे संशयितांनी सांगितले. त्यामुळे फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली. सहायक पोलिस निरीक्षक परवेज शिकलगार तपास करीत आहेत.
कर्ज काढून गुंतवणूक
फिर्यादीने ॲप डाउनलोड केले. त्यावर पहिल्या टप्प्यात थोडी गुंतवणूक केली. त्यावर नफा मिळाल्याचे ॲपवर दिसत होते. त्यामुळे फिर्यादीने त्यांच्याकडील रक्कम भरली. त्यानंतर आणखी गुंतवूणक करण्यासाठी विविध बँकांकडून कर्ज घेतले. कर्ज म्हणून मिळालेली रक्कम देखील त्यांनी गुंतवणूक केली.