पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीपट्टीचे ७८ कोटी वसूल; ३०० जणांचे कनेक्शन कट!
By ज्ञानेश्वर भंडारे | Published: April 1, 2024 04:30 PM2024-04-01T16:30:04+5:302024-04-01T16:30:40+5:30
महापालिकेला पाणी पुरवठा विभागाकडून म्हणावे तसे उत्पन्न मिळत नसून थकबाकीही वाढत होती....
पिंपरी : महापालिकेला २०२३-२४ या आर्थिक वर्षात ७८ कोटी ५७ लाखांची पाणीपट्टी वसूल करण्यात यश आले आहे. गतवर्षापेक्षा १५ कोटींची अधिक पाणीपट्टी वसुल केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक अशा १ लाख ७६ हजार अधिकृत नळ जोडधारक आहेत. महापालिकेला पाणी पुरवठा विभागाकडून म्हणावे तसे उत्पन्न मिळत नसून थकबाकीही वाढत होती.
एकीकडे मिळकत करातून दिवसेंदिवस उत्पन्न वाढत असताना पाणीपट्टी मात्र थकीत राहत असल्याने महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होत होता. तसेच पाणीपट्टीची थकबाकीही मोठ्या प्रमाणावर राहत होती. त्यामुळे यावर्षीपासून पाणीपट्टी वसुली करसंकलन विभागाने करावी, असा आदेश काढण्यात आला होता. त्यानुसार करसंकलन विभागाने पाणीपट्टी वसुली केली आहे.
तीनशेपेक्षा अधिक नळजोड खंडित...
गेल्या अनेक वर्षांपासून पाणी पट्टी न भरणाऱ्या ३०० पेक्षा जास्त मालमत्ता धारकांचे नळजोड खंडित करण्याची कारवाई केली. मीटर निरीक्षक यांना कर संकलन वसुली पथकाची साथ मिळाली आणि या कारवाईमुळेच ६० काेटींच्या पुढे कधीही वसूल न होणारी पाणीपट्टी आता ८० काेटींच्या घरात गेली आहे.
अशी वसूल झाली पाणीपट्टी
धनादेश- २४ कोटी ४१ लाख
रोख - १९ कोटी २१ लाख
ऑनलाइन - २१ कोटी ६४ लाख
बीबीपीएस- १३ कोटी ३२ लाख
एकूण --७८ काेटी ५७ लाख
वर्ष वसूल झालेली पाणीपट्टी
२०१९-२० : ४२ कोटी ९४ लाख
२०२०-२१ : ४१ कोटी ८६ लाख
२०२१-२२ : ५४ कोटी ९७ लाख
२०२२-२३ : ५७ कोटी ६७ लाख
२०२३-२४ : ७८ कोटी ५७ लाख