Share Market: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने व्यावसायिकाची ८२ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 06:23 PM2022-01-30T18:23:19+5:302022-01-30T18:23:31+5:30
फॉरेक्स ट्रेडिंग तसेच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून व्यावसायिकाची ८२ लाख पाच हजार रुपयांची फसवणूक केली
पिंपरी : फॉरेक्स ट्रेडिंग तसेच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून व्यावसायिकाची ८२ लाख पाच हजार रुपयांची फसवणूक केली. लिंक रोड, चिंचवड येथे १० ऑक्टोबर २०१९ ते २९ जानेवारी २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला.
संदीप शांताराम निकम (वय ५०, रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अजित पन्नालालजी ललवाणी (रा. उरुळी कांचन), प्रवीण चिमाजी निंबाळकर (रा. धायरीगाव, सिंहगड रोड, पुणे) आणि एक महिला यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये पैसे लावले तर मी तुम्हाला चांगला फायदा करून देतो, असे सांगून आरोपी अजितने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीकडून सुरुवातीला पाच लाख रुपये आणि नंतर एक लाख रुपये, असे सहा लाख रुपये घेतले. त्यातील ५० हजार रुपये परतावा आरोपीने दिला. त्यानंतर फिर्यादीचा फोन उचलणे बंद केले आणि त्यांना आरोपी भेटले नाहीत.
इंडियन शेअर मार्केटमध्ये तुम्ही पैसे लावा, आम्ही तुम्हाला चांगले पैसे मिळवून देऊ, असे आमिष आरोपी प्रवीण आणि आरोपी महिला यांनी दिले. तसेच फिर्यादीकडून ७६ लाख ५५ हजार रुपये घेतले. पैसे घेऊन फिर्यादीला परतावा दिला नाही. यामध्ये फिर्यादीची एकूण ८२ लाख पाच हजार रुपयांची फसवणूक झाली, असे फिर्यादी नमूद आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश माने तपास करीत आहेत.