आजाराला कंटाळून पिंपरीमधील ८५ वर्षीय महिलेने नदीत उडी मारून संपवलं जीवन
By नारायण बडगुजर | Updated: February 17, 2025 22:29 IST2025-02-17T22:28:07+5:302025-02-17T22:29:05+5:30
इंदुबाई भीमराव जाधव असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव

आजाराला कंटाळून पिंपरीमधील ८५ वर्षीय महिलेने नदीत उडी मारून संपवलं जीवन
नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी: आजाराला कंटाळून ८५ वर्षीय वृद्ध महिलेने पवना नदीत उडी मारून आत्महत्या केली. अग्निशामक दलाच्या पथकाने शोध घेऊन काही तासांतच तिचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. रावेत येथे पवना नदीच्या जाधव घाटावर सोमवारी (दि. १७ फेब्रुवारी) ही घटना घडली.
इंदुबाई भीमराव जाधव (८५, रा. शिवले चाळ, वाल्हेकरवाडी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. रावेत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन फटांगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत येथे पवना नदीच्या जाधव घाट येथे एका महिलेने नदीत उडी मारल्याची माहिती मिळाली. त्यानुसार रावेत पोलिसांनी आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या पथकाने पाण्यात महिलेचा शोध घेतला. काही तासांतच महिलेचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. इंदुबाई जाधव यांचा मृतदेह असल्याचे समोर आले. इंदुबाई आजारी होत्या. त्यातूनच त्यांनी नदीत उडी घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.