९,४५८ सदनिकांसाठी ८८५ कोटी
By admin | Published: May 21, 2017 03:57 AM2017-05-21T03:57:13+5:302017-05-21T03:57:13+5:30
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहराच्या विविध भागांतील १० ठिकाणी ९ हजार ४५८ सदनिका बांधण्याचे नियोजन पिंपरी - चिंचवड महापालिकेने केले असून
- लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहराच्या विविध भागांतील १० ठिकाणी ९ हजार ४५८ सदनिका बांधण्याचे नियोजन पिंपरी - चिंचवड महापालिकेने केले असून, त्यासाठी ८८५ कोटी १२ लाख रुपये खर्च येणार आहे.
गृहयोजनेच्या ठिकाणी विविध मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी ५० कोटी १५ लाख रुपये खर्च होणार आहे. या दोन्ही खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव शहर सुधारणा समितीसमोर आला आहे.
महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेसाठी नागरिकांकडून अर्ज मागविले आहेत. शहराच्या विविध भागात १० ठिकाणी ९ हजार ४५८ सदनिका बांधण्याचे नियोजन आहे. प्रत्येक सदनिकेच्या बांधकामासाठी ८ लाख २७ हजार ४४६ रुपये खर्च येणार आहे.
त्यासाठी केंद्र सरकार दीड लाख रुपये आणि राज्य सरकार एक लाख रुपये अनुदान देणार आहे. उर्वरित हिस्सा लाभार्थ्याकडून घेण्याचे नियोजन आहे.
प्रत्येक मजल्यावर १६ सदनिका आणि दोन लिफ्ट असतील. इमारतींच्या ठिकाणी अग्निशमन व्यवस्था, जमिनीखाली व इमारतीवर आवश्यक क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या, प्रत्येक इमारतीला सोलर हिटर सुविधा, इमारतीच्या वाहनतळात स्वच्छतागृहासह सोसायटीचे कार्यालय असेल. घर नसणाऱ्या आणि ३ लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गृहयोजनेचा लाभ घेता येणार आहे.