९०४ कर्मचाऱ्यांची प्रशिक्षणास दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 12:45 AM2019-04-01T00:45:58+5:302019-04-01T00:46:17+5:30
लोकसभा निवडणूक : कर्मचाऱ्यांना नाही गांभीर्य; वारंवार सूचना देऊनही केले दुर्लक्ष
पिंपरी : लोकसभा निवडणुकीसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यात शहरातील चिंचवड, भोसरी आणि पिंपरी या तीनही विधानसभा मतदारसंघातून सुमारे ५०४९ कर्मचाºयांसाठी मतदान प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षणासाठी तब्बल ९०४ कर्मचारी अनुपस्थित होते.
लोकसभा मावळ मतदारसंघात शहरातील चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा तर शिरूर मतदारसंघात भोसरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या तीनही मतदारसंघांसाठी मतदान कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले. पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणाचे विधानसभा मतदारसंघनिहाय आयोजन केले होते. व्हीव्हीपॅट मशिन कशा पद्धतीने कार्य करते, त्यावर मतदारांना दिसणारी पावती, ईव्हीएम यंत्र आणि त्यातील तांत्रिक बाबींची माहिती कर्मचाºयांना देण्यात आली. या यंत्रांची जोडणी, हाताळणी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले़ तसेच प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले. मतदान सुरळीत पार पडण्यासाठी घ्यावयाची खबरदारी, गोंधळ टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आदींबाबत निवडणूक विभागाच्या अधिकाºयांनी कर्मचाºयांना मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय कार्य आणि कर्तव्य म्हणून निवडणुकीचे कामकाज आणि जबाबदारी पार पाडण्यात येते. त्यामुळे यात कसूर केल्यास कारवाई करण्यात येते. मात्र असे असतानाही काही कर्मचारी प्रशिक्षणास अनुपस्थित राहिले. अशा कर्मचाºयांची विधानसभा मतदारसंघनिहाय यादी तयार करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे यादी पाठविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार नोडल अधिकारी किंवा सक्षम अधिकारी याबाबत कायदेशीर कार्यवाही करतील. गैरहजर कर्मचाºयांवरील कारवाई होऊ शकते.
पिंपरीतील ९९ कर्मचाºयांना वगळले
पिंपरी विधानसभा मतदारसंघातील २०७३ कर्मचाºयांसाठी प्रशिक्षण आयोजित केले होते. त्यात १४९२ कर्मचाºयांनी प्रशिक्षण घेतले. ४८२ कर्मचारी अनुपस्थित राहिले. तसेच ९९ कर्मचाºयांना निवडणूक कामाची अन्य जबाबदारी असल्याने प्रशिक्षणास उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे त्यांना अनुपस्थित कर्मचाºयांच्या यादीतून वगळले आहे.
शिवाजीनगरच्या कर्मचाºयांनाही प्रशिक्षण
चिंचवडमधील १३२६ कर्मचाºयांसाठी प्रशिक्षण आयोजित केले होते. यातील १५२ कर्मचारी अनुपस्थित होते. चिंचवड मतदारसंघातील कर्मचाºयांसह शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील कर्मचाºयांनाही प्रशिक्षण देण्यात आले. भोसरीतील १६५० कर्मचाºयांपैकी २७० कर्मचारी अनुपस्थित होते.