मोरया गोसावी मंदिर परिसरात सुशोभीकरणाला ९ कोटींचा खर्च होणार; दोन टप्प्यात मार्गी लागणार काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 12:59 PM2020-09-21T12:59:27+5:302020-09-21T13:01:07+5:30
चिंचवडगावातील मोरया गोसावी मंदिर आणि मंगलमूर्ती वाडा या स्थळांना धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे.
पिंपरी : चिंचवड येथील मंगलमूर्ती वाडा, चापेकर शिल्पसमूह, मोरया गोसावी मंदिरापासून थेरगाव बोट क्लबपर्यंत सुमारे दीड किलोमीटर परिसरातील दुसऱ्या टप्प्यातील सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे नऊ कोटी रुपये खर्च होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील काम करणाऱ्या ठेकेदारालाच दुसऱ्या टप्प्यातील काम दिले आहे.
चिंचवडगावातील मोरया गोसावी मंदिर आणि मंगलमूर्ती वाडा या स्थळांना धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. हजारोंच्या संख्येने भाविक दररोज मोरया गोसावी समाधी मंदिरात दर्शनासाठी येतात.
क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या स्मृती जतन व्हाव्यात, उद्याच्या पिढीला त्यांच्या कार्याचे महत्त्व समजावे, यासाठी हे शिल्पसमूह महत्त्वपूर्ण ठरत आहे. थेरगाव बोट क्लब येथे केजूबाई बंधारा हा निसर्गरम्य परिसर आहे. याठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात.
पिंपरी - चिंचवड महापाालिकेतर्फे चिंचवड येथील मंगलमूर्ती वाडा, चापेकर शिल्पसमूह, मोरया गोसावी मंदिरापासून थेरगाव बोट क्लबपर्यंतच्या सुमारे दीड किलोमीटर परिसरातील दुसऱ्या टप्प्यातील सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी ११ कोटी ५५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार निविदा मागविण्यात आल्या. सात ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यापैकी एच. सी. कटारिया या ठेकेदाराने निविदा दरापेक्षा २२.६ टक्के कमी दर सादर केला. त्यानुसार, ८ कोटी ९६ लाख रुपये अधिक ५ लाख २३ हजार रुपये मटेरियल टेस्टींग शुल्क असे ९ कोटी १ लाख रुपये या सुशोभीकरणासाठी खर्च होणार आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी निविदा स्वीकारण्यास मान्यता दिली आहे.
---
जुन्याच ठेकेदाराला काम
मोरया गोसावी मंदिर ते थेरगाव बोट क्लबपर्यंत सुशोभीकरणाचे पहिल्या टप्प्यातील काम एच. सी. कटारिया या ठेकेदारालाच देण्यात आले होते. त्यासाठी आठ लाख रुपये खर्च झाला. आता पुन्हा निविदा प्रक्रिया राबवूनही दुसऱ्या टप्प्यातील कामही त्याच ठेकेदाराला मिळाले आहे.