जागा विक्रीच्या बहाण्याने व्यावसायिकाला ९५ लाखांचा गंडा; पैसे परत न देता धमकीही दिली
By नारायण बडगुजर | Published: February 29, 2024 03:34 PM2024-02-29T15:34:03+5:302024-02-29T15:35:16+5:30
जागा विक्रीचा व्यवहार पूर्णही केला नाही, तसेच पैसे परत न देता धमकी दिली
पिंपरी : जागा विक्रीस असल्याचे सांगून व्यावसायिकाकडून ९५ लाख रुपये घेतले. त्यानंतर जागेचा व्यवहार पूर्ण केला नाही. तसेच पैसे परत न देता धमकी दिली. रहाटणीतील जगताप डेअरी चौकात १४ जुलै २०१८ ते २८ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत फसवणुकीचा हा प्रकार घडला.
चैतन्य दिनेश शहा (३७, रा. डेक्कन, पुणे) यांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सुरेश शंकरराव जुनवणे (५०, रा. जगताप डेअरी चौक, रहाटणी) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहा गुंठे जागा विक्रीसाठी असल्याचे सुरेश जुनवणे याने फिर्यादी शहा यांना सांगितले. मात्र त्या जागेचा वाद सुरू असल्याचे त्याने सांगितले नाही. त्या जागेचा एक कोटी ८० लाख रुपयांना व्यवहार ठरवला. शहा यांनी व्यवहारातील ९५ लाख रुपये दिले. मात्र त्यानंतर जागेचा व्यवहार पूर्ण केला नाही. शहा यांनी दिलेले ९५ लाख रुपये परत मागितले. ती रक्कम परत न करता त्यांची फसवणूक केली. ‘मी तुझे पैसे देणार नाही. तुला काय करायचे ते कर. तू जर परत इकडे दिसलास तर तुला मी काय आहे ते दाखवतो’, अशी धमकी दिली. तसेच काही अनोळखी लोकांना पाठवून शहा यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. सहायक पोलिस निरीक्षक पद्मभूषण गायकवाड तपास करीत आहेत.