Pimpri Chinchwad: मीटरमध्ये फेरफार करून १८ महिन्यांमध्ये ९८ लाखांची वीजचोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 09:15 AM2022-07-05T09:15:11+5:302022-07-05T09:15:17+5:30
आरोपींनी वीजमीटरमध्ये रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने फेरफार करून १८ महिन्यांमध्ये २ लाख ४ हजार २९२ युनिटची म्हणजेच ९८ लाख ८ हजार ४४० रुपयांची वीजचोरी केली
पिंपरी : बांधकाम साईटवरील वीजमीटरमध्ये फेरफार करून ९८ लाख ८ हजार ४४० रुपयांची वीजचोरी केली. भोंडवेवस्ती, रावेत येथे १ जुलै रोजी हा प्रकार उघडकीस आला. रवी खिलुमन ओछानी, अजय प्रकाश आव्हाड (दोघे रा. भोंडवेवस्ती, रावेत) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता अनिल कुराडे (वय ४०) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची रावेत येथे ‘स्टार व्हिस्टा’ नावाने बांधकाम साईट सुरू आहे. या बांधकाम साईटवर वीजचोरी होत असल्याची माहिती महावितरण कंपनीच्या भरारी पथकाला मिळाली. त्यानुसार, फिर्यादी यांच्या भरारी पथकाने पाहणी केली असता आरोपींनी वीजमीटरमध्ये रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने फेरफार करून १८ महिन्यांमध्ये २ लाख ४ हजार २९२ युनिटची म्हणजेच ९८ लाख ८ हजार ४४० रुपयांची वीजचोरी केल्याचे समोर आले, असे फिर्यादीत नमूद आहे.
महावितरण कंपनीच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक कमांडर शिवाजी इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे उपकार्यकारी अभियंता अनिल कुराडे, सहायक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी शुभांगी पतंगे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.