तृप्तीचा ढेकर अन् सुटकेचा निश्वास! बंदोबस्तावरील पोलिसांना न्याहारीसह जेवण-पाणी
By नारायण बडगुजर | Published: May 13, 2024 07:15 PM2024-05-13T19:15:01+5:302024-05-13T19:15:58+5:30
बंदोबस्ताचा ताण असतानाही पोलिसांनी तृप्तीचा ढेकर दिला अन् मतदान शांततेत पार पडल्याने सुटकेचा निश्वास सोडला....
पिंपरी : लोकसभा निवडणुकीसाठी पोलिसांनी गेल्या दोन महिन्यांपासून जोरदार तयारी केली होती. यात सोमवारी मतदान प्रक्रियेसाठी देखील सहा पोलिसांचा फौजफाटा तैनात केला होता. या पोलिसांसाठी सकाळी न्याहारी आणि दुपारी जेवणाची व्यवस्था केली होती. त्यासाठी फुड पॅकेट तसेच इतर सुविधाही उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यामुळे बंदोबस्ताचा ताण असतानाही पोलिसांनी तृप्तीचा ढेकर दिला अन् मतदान शांततेत पार पडल्याने सुटकेचा निश्वास सोडला.
पुणे शहर, शिरुर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. या तिनही मतदासंघांचा काही भाग पिंपरी - चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत येतो. त्यात आयुक्तालयाच्या हद्दीत ४०७ मतदान केंद्रे तर १ हजार ७८७ बूथ होते. त्यासाठीच्या बंदोबस्तामध्ये पोलिस आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्यासह सहा उपायुक्त, ११ सहायक आयुक्त, ३२५ अधिकारी (पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक), चार हजार अंमलदार, १५०० होमगार्ड, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या सहा पथकांचा समावेश होता. यातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त शहराबाहेरून मागवला होता.
मतदान केंद्रांवर मतदानाच्या आदल्या दिवशी रविवारपासून बंदोबस्त लावण्यात आला. तसेच प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी सोमवारी सकाळी मतदान केंद्र परिसरात आणखी बंदोबस्त लावण्यात आला. रविवारी बंदोबस्तावर असलेल्या होमगार्ड, पोलिस तसेच इतर दलांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शनिवारी देखील जेवणाची व्यवस्था केली होती. तसेच रविवारी सकाळी केळी, पोहे यासह इतर न्याहारीची व्यवस्था केली होती.
पोलिस ठाणे स्तरावर व्यवस्था -
पिंपरी -चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत १८ पोलिस ठाणे आहेत. या प्रत्येक पोलिस ठाण्यांतर्गत मतदान केंद्रांवरील बंदोबस्तावरील पोलिसांसाठी न्याहारी व जेवणाची व्यवस्था संबंधित स्थानिक पोलिस ठाणे स्तरावरून करण्यात आली होती. त्यामुळे न्याहारी आणि जेवणाचे वाटप करणे सोपे झाले.
बंदोबस्तावरील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी मंडप, खूर्ची यासह न्याहारी व जेवणाची व्यवस्था केली होती. तसेच पिण्यासाठी पाण्याचीही व्यवस्था होती. पोलिस ठाणे स्तरावरून त्याचे नियोजन केले होते.
- माधुरी कांगणे, पोलिस उपायुक्त