शाब्दिक वादातून डोक्यात फोडली बाटली; गंभीर जखमी झाल्याने तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 06:18 PM2022-04-03T18:18:51+5:302022-04-03T18:19:19+5:30
मित्राच्या वाढदिवसानिमित्त १० ते १५ जण हाॅटेलात जेवणासाठी गेले असता जेवण केल्यानंतर त्यातील काही जणांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन वाद झाला.
पिंपरी : मित्राच्या वाढदिवसानिमित्त १० ते १५ जण हाॅटेलात जेवणासाठी आले. जेवण केल्यानंतर त्यातील काही जणांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन वाद झाला. यात काचेच्या बाटलीने वार करून तरुणाचा खून केला. ही घटना भोसरी येथे रविवारी (दि. ३) दुपारी तीनच्या सुमारास घडली.
अतिक सय्यद (वय २७, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी. मूळगाव बुलढाणा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मित्राच्या वाढदिवसानिमित्त अतिक हा रविवारी दुपारी १० ते १५ मित्रांसोबत हाॅटेलमध्ये जेवण करण्यासाठी आला होता. जेवण झाल्यानंतर सर्वजण हॉटेलच्या बाहेर आले. तिथे त्यांच्यातील चार जण आणि अतिक यांच्याबत शाब्दिक बाचाबाची झाली. या वादाच्या रागातून एकाने काचेची बाटली फोडून अतिक याच्यावर हल्ला केला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अतिक याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तीन संशयितांना ताब्यात घेतल असून उर्वरित आणखी एकाचा शोध सुरू आहे.