दि सेवा विकास बँकेचा माजी चेअरमन अमर मूलचंदानीसह ६ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 06:38 PM2023-01-29T18:38:24+5:302023-01-29T18:38:33+5:30
ईडीची कारवाई सुरू असताना केले पुरावे नष्ट
पिंपरी : दि सेवा विकास बँकेचा माजी चेअरमन अमर मूलचंदानी याच्या घरावर सक्तवसुली संचालनालय (ईडी)च्या पथकाने शुक्रवारी (दि. २७) छापा मारला. यावेळी सरकारी कामात अडथळा निर्माण केला तसेच पुरावे नष्ट केल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दरम्यान, अमर मूलचंदानी यास उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर अन्य पाच जणांना रविवारी (दि. २९) न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
अमर मूलचंदानी, अशोक साधुराम मूलचंदानी, मनोहर साधुराम मूलचंदानी, दया अशोक मूलचंदानी, साधना मूलचंदानी, सागर मनोहर मूलचंदानी, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दि सेवा विकास को ऑप बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणात पिंपरी-चिंचवड शहरात अनेक गुन्हे दाखल झाले. सहकारी संस्थेकडून दि सेवा विकास को ऑप बँकेचे लेखापरीक्षण करण्यात आले. त्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले होते.
सेवा विकास बँक गैरव्यवहार प्रकरणी ‘ईडी’ने शुक्रवारी सकाळी साडेसहाला अमर मूलचंदानी याच्या घरावर छापा मारला. बराच वेळ दरवाजा ठोठावून देखील दरवाजा न उघडल्याने दरवाजा तोडण्यास सुरवात केली. त्यानंतर दरवाजा उघडला. ईडीचे अधिकारी घरात आल्यानंतर बराच वेळ अमर मूलचंदानी एका खोलीत लपून होता. मात्र, त्या खोलीचा दरवाजा उघडत नसल्याने तो दरवाजा तोडण्याची तयारी केली. त्यानंतर चावीने हा दरवाजा उघडण्यात आला. त्यानंतर ‘इडी’च्या पथकाने अमर मूलचंदानीला ताब्यात घेतले. दरम्यान, अमर मूलचंदानी याने मोबाइलमधील पुरावे नष्ट केले, असे फिर्यादीत नमूद आहे. ईडीने ताब्यात घेताच काही वेळाने अमर मूलचंदानी याने छातीत दुखत असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर त्याला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले.
''अमर मूलचंदानी हा रुग्णालयात आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अमर मूलचंदानी याच्यासह सहा जणांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोपींमध्ये महिलांचा देखील समावेश आहे. महिलांना रविवारी (दि. २९) ताब्यात घेतले. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता महिलांसह पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. - रुपाली बोबडे, पोलीस निरीक्षक, तपास अधिकारी''